थायलंडला पळालेल्या लुथरा बंधूंच्या मुसक्या आवळल्या; नाईट क्लबला आग लागल्यानंतर 6 तासांमध्येच पळाले, आज हिंदुस्थानात परत आणणार

गोव्यातील ‘बिर्च बाय रोमिओ लेन’ या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. नाईट क्लबला आग लागल्यानंतर तडकाफडकी थायलंडला पळून गेलेले नाईट क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना अखेर थायलंडमध्ये अटक करण्यात आली असून दोघांना अंतरिम जामीन देण्यासही दिल्लीतील सत्र न्यायालयाने नकार दिला. दोघांना आता थायलंडमधून नवी दिल्ली येथे शुक्रवारी आणले जाण्याची शक्यता आहे.

  नाईट क्लबला 6 आणि 7 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती. त्यात नाईट क्लबच्याच 20 कर्मचाऱयांसह 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे नाईटक्लबचे मालक लुथरा बंधू हे तारखेला पहाटेच थायलंडला इंडिगोच्या विमानाने पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली होती. अखेर दोघांना थायलंड पोलिसांनी जेरबंद केले. हिदुस्थानी अधिकाऱयांचे एक पथक थायलंडला गेले असून 24 तासांच्या आत सौरभ आणि गौरव या भावांना नवी दिल्लीत आणले जाईल. त्यानंतर त्यांना गोवा पोलीस ताब्यात घेऊ शकतात. तसेच दोघांचा पासपोर्टदेखील रद्द केला जाऊ शकतो.

ट्रांझीट अंतरिम जामिनासाठी अर्ज

लुथरा बंधूंनी दिल्लीतील रोहिणी येथील न्यायालयात ट्रांझीट अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. आम्ही कामाच्या निमित्ताने 6 डिसेंबरलाच थायलंडला गेलो होतो. आम्हाला न्यायालयात सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी केवळ काही दिवसांचे संरक्षण मागत आहोत, असा दावा त्यांनी वकिलांमार्फत केला.

 अवघ्या पावणेतीन तासांत देश सोडला

लुथरा बंधूंच्या दाव्यांवर गोवा पोलिसांनी तीव्र आक्षेप घेऊन न्यायालयाला सांगितले की, दोघांचा थायलंडमध्ये कोणताही व्यवसाय नाही. 6 डिसेंबरला पावणे बाराच्या आसपास आग लागली. 12 वाजून 4 मिनिटांनी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर 7 तारखेला पहाटे 1.17 वाजता लुथरा बंधूंनी ऑनलाईन ट्रव्हल पंपनीच्या वेबसाईटवरून फुकेटचे तिकीट बुक केले आणि पहाटे 5.30 वाजता इंडिगोच्या विमानाने पळाले. दोघांनी तपास अधिकाऱयांची दिशाभूल केल्याचे म्हणत पोलिसांनी दोन्ही भावांचे दावे खोडून काढले.