गोदावरीची पाण्याची पातळी वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा व पेठमध्ये आज पावसाची संततधार सुरू होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ८० टक्के, तर दारणा ८२ टक्के भरले आहे. गंगापूरमधून ५९३१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे.
त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या तालुक्यांमध्ये आज दिवसभर मध्यम ते तुरळक सरी बरसत होत्या. नाशिक, सिन्नर, दिंडोरी, चांदवड या तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर, गंगापूरसह पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्के भरले आहे. दारणा धरणात ८२ टक्के साठा झाला आहे.

मागील आठवडय़ात सोमवारी गोदावरी नदीला या पावसाळ्यातील पहिला पूर आला होता. बुधवारी गंगापूर धरणातील विसर्ग कमी केल्याने पूर ओसरला होता. गंगापूरमधून आज सायंकाळी ५ वाजता ५९३१ क्यूसेक्स, तर शहरातील होळकर पुलाखालून ७८३० क्यूसेक्स पाणी सोडल्याने गोदावरी नदीची पाणीपातळी पुन्हा वाढली. यामुळे घाटावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून, पुराचे प्रमाण मानल्या जाणाऱ्या दुतोंडय़ा मारूतीच्या कंबरेपर्यंत पाणी पोहचले आहे.