
राज्यात आघाडीची सहकारी दूध संस्था आणि जिल्ह्याची प्रमुख आर्थिक नाडी; शिवाय, हजारो कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीने 99.78 टक्के मतदान झाले. जोरदार शक्तिप्रदर्शनात ठरावधारकांना मतदार केंद्रात आणल्याचे दिसून आले.
गेल्या 25 वर्षांपासून गोकुळमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसचेच आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेव महाडिक या सत्ताधाऱयांविरोधात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक अशी तगडी फळी टक्कर देत आहे. गेल्या वेळी सतेज पाटील यांनी एकाकी लढत देऊन सत्ताधाऱयांना चांगलाच घाम फोडला होता. यावेळी तर सतेज पाटील यांच्यासोबत जिल्ह्यातील मातब्बर नेते असल्याने आता सत्ता राहणार की परिवर्तन होणार याचा निकाल येत्या मंगळवारी (दि. 4) लागणार असून, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गोकुळच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, पाठिंबा देण्या-घेण्यावरून ते नेत्यांची सौदेबाजी, आपमतलबीपणा तसेच उमेदवारीतील घराणेशाही सर्वांना पुन्हा एकदा यानिमित्ताने पाहायला मिळाली. त्यात ठरावधारक मतदारांना नगरसेवकांप्रमाणे घोडेबाजाराची हौसही भागवता आली. आपल्या ताब्यात ठेवलेल्या मतदारांना घेऊनच नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करत मतदान केंद्र गाठले.
सकाळी 8 ते 5 या कालावधीत मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराची तपासणी करूनच मतदानासाठी सोडले जात होते. जिल्ह्यातील 70 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. प्रत्येक मतदान केंद्रांवर सुमारे 59 ते 55 मतदारांना मतदानाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक मतदाराचे थर्मल स्कॅनिंग व सॅनिटाइझ करून मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. कोरोनाबाधित मतदारांसाठी शेवटच्या तासात मतदानाची सोय करण्यात आली होती.
सात तालुक्यांत शंभर टक्के मतदान
n एकूण 3 हजार 647 ठरावधारक मतदार असून, कोरोनामुळे यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 8 मतदारांनी मतदान केले नाही. दिवसभरात 887 महिला, तर 2 हजार 752 पुरुष अशा एकूण 3 हजार 639 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, पन्हाळा, करवीर, चंदगड आणि कागल तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले, तर राधानगरी- 99.78, शाहूवाडी – 99.65, आजरा – 99.57, भुदरगड – 98.93 आणि गगनबावडा तालुक्यात 98.68 टक्के मतदान झाले.



























































