सोने- चांदीत तेजी कायम; चांदी 3 लाख तर सोने दीड लाखांचा टप्पा लवकरच गाठण्याची शक्यता

सोने- चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीने तेजी दाखवली आहे. गेल्या आठवड्यात त्यात किरकोळ घसरण झाली असली तरीही वायदे बाजारात व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दोन्ही धांतूमध्ये तेजी दिसून आली. आगामी काळातही सोने-चांदीमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वायदे बाजार आणि सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात तुफानी वाढ दिसून येत आहे. गुरुवारी वायदे बाजार सुरू होताच त्यात सुमारे 400 रुपयांची घसरण होत ते 1,42,732 रुपयांवर व्यवहार करत होते. तर चांदीच्या दरातही सुमारे 2000 घसरण होत ते 2,89,200 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढता जागतिक तणाव आणि जागतिक अस्थिरता, अनिश्चिततेमुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत वाढ होत आहे.

वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत 15 दिवसांत 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर एका वर्षात ती 80 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. या वर्षी आतापर्यंत त्यात १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आणि 190 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर चांदीची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तज्ज्ञांनी सांगितले. तसेच दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नफावसुलीमुळेही दरांमध्ये वाढ दिसून येत आहे.

चांदीप्रमाणेच सोन्याच्या किमतीतही विक्रमी वाढ झाली आहे. एका वर्षात सोने ८० टक्क्यांहून अधिक वाढले आहे आणि चांदीच्या किमती १९० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. बुधवारी वायदे बाजारात (एमसीएक्सवर) सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४३,५९० या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला, तर चांदी प्रति किलोग्रॅम २,९१,४०६ या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती सुमारे ०.६७ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,४३,२०१ वर बंद झाल्या, तर चांदीच्या किमती सुमारे ५ टक्क्यांनी वाढून प्रति किलोग्रॅम २,८९,००० वर पोहोचल्या आहेत.

जागतिक अनिश्चिततेच्या काळात चांदी सामान्यतः सोन्यापेक्षा १.५ ते २ पट जास्त वाढते आणि चालू सत्रात हा पॅटर्न स्पष्टपणे दिसून येतो. तसेच सध्याचा परिस्थितीचा विचार केला तर वायदे बाजारात चांदीच्या किमती प्रति किलो ₹३.९४ लाखांपर्यंत पोहोचू शकतात. तर सोन्याच्या किमती ₹१.६० लाखांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.