
आर्थिक गुंतवणुकीचा एक महत्त्वपूर्ण पर्याय म्हणजे सोने. सोन्यातली गुंतवणूक ही सर्वथा सुरक्षित आणि लाभदायक मानली जाते. मग अशा वेळी सोन्याची पारख करणं, हे अत्यावश्यक असतं. ते पारखण्याची सध्याची सगळ्यात आदर्श पद्धत म्हणजे हॉलमार्किंग. पण, हे हॉलमार्किंग नेमकं असतं काय?
याच प्रश्नाला कोरा या प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावर उत्तर देण्यात आलं आहे. तर, सोनाराने दिलेल्या सोन्याच्या दागिन्यात शुद्ध सोन्याचे प्रमाण किती, हे ठरवणारी प्रणाली म्हणजे हॉलमार्किंग होय. हॉलमार्किंग खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करून त्यांना सोन्याची अस्सलता ओळखण्यात मदत करते. हॉलमार्क हे धातूपासून बनवलेल्या वस्तूंवर उमटवण्यात येणारे अधिकृत चिन्ह आहे. हे मुख्यतः प्लॅटिनम, सोने, चांदी आणि काही राष्ट्रांमध्ये पॅलेडियम यासारख्या धातूची शुद्धता प्रमाणित करण्यासाठी वापरले जाते.
हिंदुस्थानात, भारतीय मानक ब्युरोला (BIS – Bureau of Indian Standards) सोन्याची शुद्धता तपासण्याचा अधिकृत दर्जा दिला गेला आहे. ही संस्था हॉलमार्किंग केंद्रांना मान्यता देते. या केंद्रांना, एकदा मान्यता मिळाल्यावर, BIS-प्रमाणित ज्वेलर्सना हॉलमार्क प्रदान करण्यासाठी मान्यता दिली जाते. हॉलमार्क केलेले दागिने जर आपण नीट निरखून पाहिलेत तर आपल्या लक्षात येईल की त्यावर एकूण पाच खुणा अथवा चिन्हे असतात.
सर्वप्रथम असतो भारतीय मानक ब्युरोचा लोगो. त्यानंतर असतो सोन्याच्या शुद्धतेचा आकडा. इथे दिलेला 916 आकडा हे दर्शवितो की हा दागिना 22 कॅरेटचा असून यातील सोन्याची शुद्धता 91.6% आहे. याप्रमाणे, 875 म्हणजे 21 कॅरेट, 833 म्हणजे 20 कॅरेट, 750 म्हणजे 18 कॅरेट आणि 583 म्हणजे 14 कॅरेट सोने असते. यापेक्षा कमी प्रतीच्या दागिन्याचं हॉलमार्किंग केलं जात नाही.
त्यानंतर येतं त्या केंद्राचं नाव/लोगो/चिन्ह, जिथे या दागिन्याचं हॉलमार्किंग केलं गेलं आहे. चौथं चिन्ह आहे सुवर्णकाराची ओळख! ज्या सोनाराकडून आपण सोने घेतले आहे, त्याची ओळख! पाचवं आणि शेवटचं चिन्ह म्हणजे ‘दागिना तयार केल्याचे वर्ष’.
प्रत्येक वर्षासाठी एक विशिष्ट अक्षर दिलेले आहे. 2018 पासून सरकारने ‘हॉलमार्किंग’ बंधनकारक केले आहे. हॉलमार्क केलेले दागिने हे गुणवत्तेची खात्री देतात. त्याचबरोबर, ग्राहकाने जितक्या कॅरटचे पैसे मोजले आहेत तितक्याच कॅरटचे सोने मिळण्याची हमी देखील यात आहे.




























































