
ऐतिहासिक उसळी घेतल्यानंतर सोने-चांदीच्या दरांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारीही सोन्याचा दर 26 रुपयांनी खाली आला. मुंबई शेअर बाजारावर कोरोनाचे संकट असल्याने सोन्याचा दरही घसरत चालला आहे. सोन्यासह चांदीमध्येही 320 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.
गुरुवारी शेअर बाजारामध्ये जवळपास 3000 अंकांची घसरण पाहायला मिळाली, निफ्टीही जवळपास 900 अंकांनी खाली आला. बाजारावर कोरोनाचे संकट ओढावल्याने सोने-चांदीचे दरही सलग तिसऱ्या दिवशी खाली आले आहेत. सोन्याचा दर 26 रुपयांनी खाली आला. दिल्ली सराफा बाजारामध्ये 10 ग्रॅमसाठी 43,329 रुपये मोजावे लागत आहेत. सोन्यासह चांदीचा दरही प्रतिकिलोमागे 320 रुपयांनी पडला आणि सराफा बाजारामध्ये एका किलोसाठी 45,444 रुपये मोजावे लागत आहेत.

एकीकडे हिंदुस्थानात सोन्याचा दर पडत असताना दुसरीकडे विदेशी बाजारामध्ये मात्र सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसून आली. सोन्याचा दर 0.6 टक्के वाढून 1645 डॉलर प्रति औस झाला आहे. तर चांदीचा दरही 0.6 टक्के वाढून 16.85 डॉलर प्रति औस झाला आहे. सोने-चांदीच्या दरात तेजी दिसून आली, मात्र प्लॅटिनमच्या दरात 0.2 टक्के घसरण झाली आणि दर 858.63 प्रति औसवर स्थिरावला.

मुंबी शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारही कोसळला
आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमधील घसरण, येस बँकेवरील संकट आणि कोरोना व्हायरस या संकटाचा फटका हिंदुस्थानच्या शेअर मार्केटला बसला आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजार चांगलाच घसरल्याचे पाहायला मिळाले. शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 3100 अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा 950 पेक्षा जास्त अंकांनी गडगडला. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या 11.45 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ‘मनी कंट्रोल’ या आर्थिक क्षेत्रासंबंधी वृत्त देणाऱ्या वृत्तसंस्थेने दिली आहे. हिंदुस्थानसह जगभरातील बाजारातही कोरोनाची भीती आहे. Dow jones मध्ये 1464.94 अंकांची अर्थात 5.86 टक्के घसरण झाली असून 23,553 वर स्थिरावला आहे. तर एस अँड पीमध्ये 140.85 अंकांची अर्थात 4.89 टक्क्यांची घसरण झाली असून 2741 अंकांवर स्थिरावला. Nasdaq ur 392 अंक घसरला असून 7952 वर स्थिरावला आहे.


























































