
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सोन्याचे दर काही कमी होताना दिसत नाहीत. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दराने रेकॉर्ड केला. सोन्याचा भाव प्रति तोळा 37,920 रुपये इतका पोचला. मुंबई तसेच अन्य शहरांतही सोने 37 हजार रुपयांवर पोचले आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आतापर्यंतचे विक्रमी दर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आणि स्थानिक ज्वेलर्सकडून सातत्याने वाढणारी खरेदी यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या मते अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापार युद्ध पेटल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. सुरक्षित गुंतवणूकदारीसाठी सोने खरेदीचा पर्याय निवडला जात आहे. दिल्लीमध्ये चांदीच्या किमतीत काल 650 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदी आता 43, 670 रुपये प्रति किलो झाली आहे. चांदीची नाणी तयार करणाऱयांकडून चांदीची मागणी वाढली आहे.
































































