सोने वधारले! तोळ्यासाठी मोजावे लागू शकतात 58 हजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे गुंतकणूकदारांनी सोने-चांदीसारख्या सुरक्षित गुंतकणूकीला प्राधान्य दिले आहे. परिणामी सोने व चांदीचे दर वधारून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. एक तोळे सोन्याचा दर 51 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे तर चांदी 63 हजार रुपये किलो झाली आहे.

हिंदुस्थानासह अमेरिका, रशिया, चीन, प्रान्स आदी मोठय़ा देशांमधील गुंतकणूकदारही मोठय़ा प्रमाणावर सोने व चांदी खरेदी करत आहेत. महाराष्ट्रामधील जळगाव येथील प्रसिध्द सराफा बाजारात आज सोन्याचे दर जीएसटीसह 52 हजार 500 रुपये होते तर नागपूरात 53 हजार रुपये तोळे होते. सोन्याचे दर असेच चढे राहिले तर आठवडाभरात ते 55 ते 58 हजार रुपये तोळे होईल असा अंदाज सराफांनी व्यक्त केला आहे.

चालू वर्षाच्या सुरूवातीला सोन्याचा दर 41 हजार 300 रुपये तोळा होता. 24 फेब्रुवारीपर्यंत तो 44 हजारांवर गेला होता. मार्चमध्ये लॉकडाऊननंतर तर सोन्यासह चांदीच्याही दरात वाढ होत गेली आणि जुलैच्या सुरूवातीला सोन्याचे दर दहा ग्रॅमला 50 हजारांवर पोहोचले. कोरोना नियंत्रित होऊन अर्थक्यव्यवस्था रुळावर आली नाही तर येत्या तीन वर्षात सोने 85 हजार ते एक लाख रुपये तोळे होईल अशी भीती या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.