
सामना ऑनलाईन, पणजी
गोवा विमानतळावर कस्टम विभागाने २६ लाख रूपयांचे सोने जप्त केले आहे. विमानात जाऊन कस्टम अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना हे सोने सापडले आहे. एका अज्ञात प्रवाशाने विमानाच्या शौचालयात एक कंबरपट्टा लवपला होता, ज्यातून हे सोने हस्तगत करण्यात आले आहे. कंबरपट्ट्याच्या आत सोन्याची पावडर करून ते लपवण्यात आले होते. चौकशीत हे सोने 929 ग्रॅम वजनाचे असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी या कंबरपट्टय़ाबद्दल चौकशी करताना कोणीही त्यावर दावा सांगण्यासाठी पुढे आले नाही. गोवा कस्टम विभागाने मागच्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत हवाई प्रवाशांनी अवैधमार्गाने भारतात आणलेले 1 कोटी 30 लाखांचे सोने, चौदा लाखांचे विदेशी चलन तसेच जवळपास 25 लाखांचे अन्य व्पापारी साहित्य जप्त करण्याची कारवाई केली आहे असं सोमवारी केलेल्या कारवाईनंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.




























































