दाबोळी विमानतळावर ९७ लाखांचे सोने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, पणजी

केंद्रीय महसूल संचालनालयाच्या गोवा विभागाच्या पथकाने दाबोळी विमानतळावर गुरुवारी धडक कारवाई करून ९७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. याप्रकरणी एका हवाई प्रवाशासह विमानतळावरील दोघा सफाई कामगारांनाही अटक करण्यात आहे. तीन किलो वजनाचे हे सोने प्रवाशाने विमानतळावरील स्वच्छतागृहात लपवून ठेवले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय महसूल संचालनालयाच्या पथकाला तस्करीच्या सोन्याची गोवामार्गे हवाई वाहतूक होणार असल्याचा सुगावा लागला होता. त्यानुसार या पथकाने प्रवाशांवर पाळत ठेवली होती. या कारवाईचा भाग म्हणूनच रात्री दुबईहून दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या ओमान एअरवेजच्या विमानातील प्रवाशांच्या बॅगांची झडती घेतली. मात्र, या झडतीत त्यानां काही सापडले नव्हते.

प्रवाशांची तपासणी केल्यानंतर पथकाने आपला मोर्चा विमानतळावरील इमिग्रेशन कक्षाजवळ असलेल्या स्वच्छतागृहाकडे वळवला. तेथे तपासणी केली असता स्वच्छतागृहातील एका टिश्यू डिस्पेन्सरमध्ये सोने लपवून ठेवल्याचे आढळून आले. हे सोने ३ किलो वजनाचे असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत ९७ लाख रुपये एवढी आहे. हे सोने २६ चिप्सच्या स्वरूपात होते. हे सोने दुबईहून हिंदुस्थानात आणण्यात आले होते.

स्वच्छतागृहातील सोने महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. त्यानंतर सोने स्वच्छतागृहात लपवणाऱ्या हवाई प्रवाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. संशयानेच या अधिकाऱ्यांनी दोघा सफाई कामगारांकडे त्या तस्करीच्या सोन्याबाबत चौकशी केली असता त्या हवाई प्रवाशाला विमानतळावर रात्रीच्या वेळी ड्युटी बजावत असताना या सफाई कामगारांनी साहाय्य केल्याचे उघडकीस आले. संशयामुळेच हवाई प्रवासी व दोघे सफाई कामगार महसूल संचालनालयाच्या तावडीत सापडले. या तिघानाही महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मात्र, त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.