
धनत्रयोदशीच्या मूहूर्तावर सोने किंवा एखाद्या धातूची वस्तू खरेदी करण्याची पंरपरा आहे. यंदा आतंरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या सोन्याच्या किंमती आणि धातूंवर आयात शुल्क वाढवल्यामुळे सोन्याचे भाव वधारल्याने सोनेविक्रीत घट होण्याची शक्यता होती. मात्र, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात 30 टन सोन्याची विक्री झाली आहे. इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोशिएशनचे (आयबीजेए) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्यावर्षी देशभरात धनत्रयोदशीला 40 टन सोन्याची विक्री झाली होती.
गेल्यावर्षीपेक्षा सोन्याची विक्री 25 टक्क्यांनी घटली आहे. सोन्याचे भाव वाढल्याने खरेदीत घट झाली आहे. मात्र, मागणीत झालेली घट आणि आर्थिक मंदीचे सावट यामुळे सुमारे 20 टन सोन्याची विक्री होईल, असा अंदाज होता. अपेक्षेपेक्षा जास्त सोन्याची विक्री झाल्याचे मेहता यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या मागणीत घट झाली होती. मात्र, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोनेखरेदीसाठी उत्साह दाखवल्याने देशभरात सोन्याची चांगली विक्री झाली आहे.
अमेरिकेपेक्षा तिप्पट सोने हिंदुस्थानात, एवढे आहे मूल्य
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढलेल्या किंमती आणि आयात धातूंवर वाढवण्यात आलेल्या आयात शुल्कामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच सध्या लोकांकडे रोख रक्कम नाही. त्यामुळेही सोन्याची खरेदी मंदावली आहे. मात्र, पीएमसी बँक घोटाळा उघड झाल्यानंतर बँकिंग यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे सोने आणि चांदीसारख्या धातूंमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच जागतिक आर्थिक मंदीच्या सावटामुळेही सोन्यामधील गुतंवणूक सुरक्षित मानण्यात येत आहे. त्यामुळेही सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या विक्रीत वाढ झाली आहे.




























































