
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर पडल्याचा परिणाम राष्ट्रीय बाजारात देखील जाणवला. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर 52 हजारांच्या खाली आला. चांदीच्या दरात देखील 875 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. आगामी सणासुदीच्या काळात सोन्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम मागे 133 रुपयांनी खाली आला. आता 1 तोळ्याचा दर 52 हजारांच्या खाली आला असून 51 हजार 989 रुपये झाला आहे. तर चांदी देखील 875 रुपयानी स्वस्त झाली असून 1 किलोचा दर 63 हजार 860 रुपयांवर आला आहे.
दरम्यान, आगामी काळात सोन्याचा दर स्थिर राहील. तसेच घसरण झाल्यास तो 49 हजारांवर स्थिरावेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. तसेच अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कोण बाजी मारेल हे स्पष्ट झाल्यावर बाजारात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव सोने-चांदीच्या किमतीवर पडेल असेही तज्ज्ञांनी सांगितले.



























































