सोने तस्कर गँग गजाआड, अडीच वर्षांपासून सुरू होते तस्करीचे रॅकेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबई, थायलंड येथून चोरटय़ा मार्गाने सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश केला आहे. रमेश सुंके, सचिन जुलूम, नवीन अचनटनी, शुभम कदम, राहुल बठीजा, विक्रम खत्री, जितू छप्रु, वषदेव फेरवानी, मुकेश वाल्मीकी, मंगेश पाटील, कृष्णा गौडा अशी त्यांची नावे आहेत. त्या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

दुबई आणि बँकॉक येथून काही प्रवासी हे चोरटय़ा मार्गाने सोने पेस्ट स्वरूपात आणणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीनंतर डीआरआयच्या पथकाने विमानतळावर सापळा रचून रमेश सुंकेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच सिलिंडर पॅप्सूल जप्त केल्या. त्यानंतर डीआरआयने विमानतळाचा कर्मचारी सचिन जुलूमला ताब्यात घेऊन त्याच्याकडून काही सोने जप्त केले. या कारवाईनंतर बँकॉक येथून आलेल्या नवीनला ताब्यात घेतले. त्यानंतर डीआरआयने शुभमला ताब्यात घेतले. नवीन ते सोने शुभमला देणार होता. डीआरआयने नवीनची चौकशी केली. त्याच्या चौकशीत राहुल बठीजाचे नाव समोर आले. राहुल हा सोने तस्करीमधील सिंडिकेट आहे.

थायलंड येथे एका हॉटेलमध्ये राहुलने सोने ते नवीनला दिले होते. त्यानंतर डीआरआयने कारवाई करून विक्रमला ताब्यात घेतले. विक्रमच्या चौकशीत काही महत्त्वाची माहिती डीआरआयला मिळाली. दर दिवशी दुबई आणि बँकॉक येथून 20 प्रवासी हे सोने घेऊन हिंदुस्थानात येत असल्याचे विक्रमने डीआरआयला चौकशीत सांगितले. गेल्या अडीच वर्षांपासून ते त्या 20 प्रवाशांना दुबई आणि बँकॉक येथे पाठवत आहेत. सोन्याच्या धंद्यात नफा आल्यास तो समान नफा या तस्करांना मिळत असायचा. राहुल हा हॉटेलचे व्यवस्थापन पाहत असायचा. या तस्करीत विमानतळावरील कर्मचारी हा त्यांना मदत करत होता. मुकेश कुमार हा कर्मचाऱयाच्या मदतीने सोने बाहेर काढण्यास मदत करायचा. मंगेश आणि कृष्णा हे विमानतळावरील एका दुकानात कर्मचारी म्हणून काम करायचे. त्या दोघांना रमेशने तेथे कामाला ठेवले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. सोने तस्करीप्रकरणी त्या सर्वांची कस्टम कायद्याखाली जबाब नोंदवून त्यांना अटक केली.