गोल्ड ट्रेडिंग

>>प्रवीण धोपट

आज सोने ही कमॉडिटी आहे. सोन्याला जी किंमत प्रत्यक्ष व्यवहारात असते ती किंमत डिजिटल व्यवहारातही प्राप्त झाली आहे.

सांस्कृतिक असो, सामाजिक असो किंवा आर्थिक आपल्या गुण आणि सौंदर्याने सोने या धातूने आपले पहिल्या क्रमांकाचे स्थान सोडलेले नाही. सोने संपत्ती, ऐश्वर्य, सुबत्तेचे प्रतीक आहे. धार्मिक उत्सव, सण-समारंभ, शुभकार्य अशा प्रसंगी सोने परिधान करणे ही एक परंपरा आहे. सोने खरेदी करणे, परिधान करणे, त्याची जपणूक करणे आणि अडीअडचणीला गहाण ठेवणे किंवा विकणे ही सर्वसाधारण पद्धत असते.

आज सोने ही कमॉडिटी आहे. सोन्याला जी किंमत प्रत्यक्ष व्यवहारात असते ती किंमत डिजिटल व्यवहारातही प्राप्त झाली आहे. मल्टिकमॉडिटी एक्स्चेंजवर तिची डिजिटल खरेदी-विक्री केली जाते. प्रत्यक्ष सोने व्यवहारातल्या मर्यादा इथे नाहीत.

प्रत्यक्ष सोने खरेदी किंवा विक्री करताना घडणावळ किंवा मेकिंग चार्ज म्हणून दोन्ही बाजूने खर्च येतो. हा खर्च किती असावा यावर मर्यादा नसते. या उलट डिजिटल व्यवहारात व्यवहार करताना किती फी भरावी लागेल याची स्पष्ट कल्पना असते.

दागिन्याचे सौंदर्य नजरेला जाणवते. त्याला स्पर्श करता येतो. कॉईन, बार किंवा दागिना सांभाळता येतो. या उलट डिजिटल गोल्ड इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल स्वरूपात मिळते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याची खरेदी-विक्री होते. इथे सोने एक फायनांशिअल प्रॉडक्ट असते.

सोने परिधान करण्यापेक्षा ते सांभाळणे ही खूप मोठी जोखीम असते. त्यासाठी सेफ डिपॉझिट बॉक्ससारखा अतिरिक्त खर्च करावा लागतो. या उलट डिजिटल सोने व्यवहारात फक्त डिजिटल स्वरूपात सांभाळावे लागते. पासवर्डने ते संरक्षित करता येऊ शकते. प्रत्यक्ष सोने सांभाळण्याची जोखीम इथे शून्य असते.

प्रत्यक्ष व्यवहारात माणसाच्या भावना गुंतलेल्या असतात. खरेदी करतानाचा आनंद आणि विकतानाचे दुःख फार तीव्र स्वरूपाचे असू शकते. या उलट डिजिटल प्लॅटफॉर्म 24 तास खुला असतो. डिजिटल खरेदी-विक्री करताना व्यवहार जलद गतीने केला जातो. आज डिजिटल गोल्ड हे इटीएफ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ट्रेडेड फंडच्या माध्यमातूनही केला जातो. अनेक लोकांनी सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेंट म्हणूनही डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक सुरू केली आहे.

कमॉडिटी मार्पेट आपल्या देशात दिवसातले 14 तास सुरू असते, तर जागतिक बाजार हा 24 तास सुरू असतो. त्यामुळे एखादा ट्रेडर आपल्याला शक्य असलेल्या वेळेत ट्रेड करू शकतो.

सोने जर गुंतवणुकीचा मार्ग म्हणून स्वीकारायचा झाल्यास डिजिटल पर्याय सर्वात उत्तम आहे. वेळोवेळी आपण आपल्या गुंतवणुकीचा ट्रक ठेऊ शकतोच. परंतु आजची किंमत इतिहासातल्या किमतीशी ताडून भविष्यातील किमतीचाही वेध घेऊ शकतो आणि त्यानुसार सोने खरेदी-विक्रीचा निर्णय घेऊ शकतो.

प्रत्यक्ष सोने खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेविषयी कायम शंका असतात. काही व्यवहारांमध्ये फसण्याची शक्यता जास्त असते. या उलट डिजिटल सोन्यामध्ये सोन्याच्या शुद्धतेचा प्रश्न येत नाही. डिजिटल व्यवहारात शंभर टक्के पारदर्शकता आणि सुरक्षित मालकी हक्क असतो.
डिजिटल स्वरूपात सोने खरेदी करताना फ्युचर कॉन्ट्रक्ट, स्पॉट मार्पेट अशा पद्धतीचे पर्याय उपलब्ध असतात. इंट्राडेसारखे ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंगसाठी ब्रोकरकडून मार्जिनही उपलब्ध होत असते. याचाच अर्थ कमी पैसे असतानासुद्धा ट्रेडिंग करता येऊ शकते.

लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत.