
गुरु दत्त हे नाव नजरेसमोर आल्यावर आपल्या डोळ्यांसमोर ‘प्यासा’ , ‘कागज के फूल’ यासारखे दर्जेदार चित्रपट उभे राहतात. गुरु दत्तच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर येतेय. गुरु दत्त यांचा ‘प्यासा’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. गुरु दत्त यांच्या कलाकृती या अजरामर असल्यामुळे, आजही त्यांच्या कलाकृती या नव्या पिढीला प्रेरणा देतील अशाच आहेत.
टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या 8 ते 10 आॅगस्ट दरम्यान, त्यांच्या 100 व्या जयंती निमित्त ‘प्यासा’ हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. 1957 मध्ये प्रदर्शित झालेला ‘प्यासा’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटात एका संघर्षशील कवीची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील गुरु दत्त यांच्या अभिनयाचे सर्वदूर कौतुक झाले आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी झाला होता. हाच चित्रपट आता पुन्हा आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
गुरु दत्त यांच्या 100 व्या जयंतीचे औचित्य साधून हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, 6 आॅगस्टला या चित्रपटाचा प्रीमियर शो होणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना, त्यांची नात गौरी दत्त सांगते, “प्यासा हा त्यांच्यासाठी एक अतिशय खास चित्रपट होता. त्यांनी हा चित्रपट करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. ”
त्यांची दुसरी नात करुणा म्हणते, “आम्ही प्यासा चित्रपटाबद्दलच्या कथा ऐकत मोठे झालो आहोत. गुरु दत्त सुरुवातीला या चित्रपटामध्ये काम करण्यास तयार नव्हते. त्यांनी स्वतः काम करण्याआधी दिलीप कुमार यांच्याशी संपर्क साधला होता. गुलाबोची व्यक्तिरेखा, वहिदा रहमान यांनी साकारली होती. ती व्यक्तीरेखा एका खऱ्या व्यक्तीपासून प्रेरित आहे, असे देखील सांगितले जाते.”
गुरु दत्त यांचे ‘प्यासा’ व्यतिरिक्त, प्रेक्षकांना आर पार, चौधविन का चांद, मिस्टर अँड मिसेस 55 आणि बाझ हे चित्रपट देखील चाहत्यांना पुनर्संचयित आवृतीच्या माध्यमातून पाहण्याची संधी मिळणार आहे. हिंदुस्थान सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने अश्या ख्यातनाम चित्रपटांचे पुनर्संचयन केले जात आहे, अशी माहिती एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकास मगदुम यांनी दिली.