पिस्तुलाचा धाक दाखवून दारूचा ट्रक पळवण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिकमध्ये वनावट दारूचा जप्त केलेला ट्रक पळवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुंडांनी पिस्तुल रोखून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एक ट्रक आणि डिझायर कार सह बनावट विदेशी मदयाचे 1100 बॉक्स जप्त करून 4 आरोपींना अटक केली आहे. हल्लेखोर मात्र पसार होण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे दारू माफियांची अधिकाऱ्यांवर हात टाकण्या येवढी मजल वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बनावट विदेशी मद्य घेऊन एक ट्रक दमनहून नाशिकमार्गे गुजरातला जाणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बुधवारी दुपारी मुंबई आग्रा महमार्गावरील सोग्रस फाट्याजवळ सापळा रचून विदेशी मद्याचा साठा असलेला ट्रक पकडला. या ट्रकमध्ये 65 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. मात्र पकडलेला ट्रक नाशिककड़े घेऊन जाताना आरोपींचे काही साथीदार ट्रकचा पाठलाग केला. एका झायलो कारमधून आलेल्या पाच ते सहा गुंडांनी पिंपळगाव जवळ ट्रक अडवून अधिकाऱ्यांवर पिस्तुलचा धाक दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अधिकाऱ्यांना ट्रक सोडा नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी देत ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून आरडाओरडा केला. त्यामुळे स्थानिक नागरिक जमा होताच गुंडांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हल्ला करणाऱ्या आरोपींचा पोलीस सध्या शोध आहेत.