दीड लाखासाठी दीड महिना डांबून ठेवले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीड लाख रुपयांसाठी व्यावसायिकाला चक्क दीड महिना डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. दीड महिन्यानंतर सुटका झाल्यावर व्यावसायिकाने हा प्रकार गोरेगाव पोलिसांना सांगितला. गोरेगाव पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली असून त्याचा एक साथीदार हा फरार आहे.

ओशिवरा येथे राहत असलेले तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्याची काही महिन्यांपूर्वी एका अटक आरोपीसोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर एका आरोपीने तक्रारदार यांच्याकडे काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दिली होती. त्या एकूण रकमेपैकी काही रक्कम तक्रारदाराने परत केली नव्हती. त्या दीड लाख रुपयांचा वसुलीसाठी अटक आरोपीपैकी एकाने गोरेगाव येथे एक घर भाडय़ाने घेतले. त्या घरात तक्रारदार याना दीड महिना कोंडून ठेवले. जर याची माहिती सांगितल्यास जीवे ठार मारू अशी धमकी दिली. तसेच कुणाला संशय येऊ नये म्हणून अटक आरोपी हे तक्रारदार यांना रोज मोबाईलवर कुटुंबीयांसोबत बोलण्यासाठी देत असायचे. तेव्हा तक्रारदार हे आपण व्यवसायासाठी परराज्यात आल्याचे कुटुंबीयांना सांगत होते. अखेर दीड महिन्यानंतर तक्रारदार याने त्याची कशीबशी सुटका केली.

सुटका केल्यावर तक्रारदार याने गोरेगाव पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती दिली. गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक दत्ता थोपटे यांच्या पथकातील महिला पोलीस निरीक्षक एन. जाधव, उपनिरीक्षक गायकवाड यांनी तपास सुरू केला. डांबून ठेवणारे हे दक्षिण आणि पूर्व मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्याचा साथीदार हा फरार आहे.