
गोरेगाव पश्चिम उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत सात रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही इमारत सध्या रिकामी करण्यात आली असून काही रहिवासी नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत. तर 50 हून अधिक रहिवाशांना पालिकेच्या शाळेत आसरा देण्यात आल्याचे पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी सांगितले.
गोरेगाव पश्चिम उन्नत नगर येथील ‘जय भवानी’ इमारत सात मजली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये गुरुवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास भीषण लागली. पार्किंगमध्ये कपडय़ाच्या चिंध्यांच्या गाठोडय़ाला आग लागली अन् बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू तर 62 जण जखमी झाले असून जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. इमारतीतील काही रहिवाशांनी नातेवाईकांकडे जाणे पसंत केले असून 50 हून अधिक रहिवाशांना जवळील पालिकेच्या शाळेत आसरा देण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक वायरिंगचे ऑडिट पूर्ण
आगीमुळे इमारतीत धुराचे लोट पसरले आणि इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज नाही. इमारतीतील इलेक्ट्रिक वायरिंगचे ऑडिट पूर्ण झाले आहे. शुक्रवारी दिवसभर रहिवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र आता इमारतीतील वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला असून संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल आणि रहिवासी इमारतीत राहण्यास येतील, अशी माहिती सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिली.
































































