
अंधारात दोन्ही दिशेने येणाऱया चालक आणि पादचाऱयांना दूरवरून सिग्नल यंत्रणा दिसून वाहतूक सुरळीत ठेवणारी आणि अपघात टाळणारी स्मार्ट सिग्नल यंत्रणा आता गोरेगावच्या ओबेरॉय जंक्शनजवळ सुरू झाली आहे. अनेक दिशांमधून येणाऱया वाहनांना आणि पादचाऱयांना ही यंत्रणा मार्गदर्शन करणार असून या आधी वरळीत एकदिशा स्मार्ट यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या स्मार्ट सिग्नल यंत्रणेतील डेकोरेटिव्ह पोलमध्ये विविध रंगांच्या एलईडी लाईट असल्यामुळे हा परिसर उजळून निघाला आहे.
मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री व पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वरळीप्रमाणे पूर्ण प्रकाशित स्मार्ट सिग्नल यंत्रणा गोरेगाव पूर्व येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर शनिवारी संध्याकाळी सुरू करण्यात आली. हा मुख्य रस्ता असून नेहमी गजबजलेला असतो. पश्चिम उपनगरातील हा पहिला पायलट प्रोजेक्ट आहे तर दिंडोशीकडून गोरगावकडे जाणाऱया विरुद्ध दिशेवरील दुसऱया बहुदिशा सिग्नल यंत्रणेचे काम सुरू आहे. वरळी येथील पूर्ण प्रकाशित सिग्नल यंत्रणा एकदिशेला मार्गदर्शन करणारी आहे, मात्र गोरेगाव येथील यंत्रणेत अधिक तांत्रिक तपशील वाढवून ती बहुदिशा करण्यात आली आहे. मुंबईतील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांच्या पुढाकाराने आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या पाठपुराव्याने शुक्रवारी रात्री बहुदिशा सिग्नल यंत्रणेचे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले आणि शनिवारपासून याची सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिकेच्या पी-दक्षिण वॉर्डने हे काम पूर्ण केले. स्थापत्य समिती उपनगरे व शिवसेना नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांचेसुद्धा या योजनेला सहकार्य लाभले. वरळीप्रमाणे पूर्ण प्रकाशित सिग्नल यंत्रणा बसवावी अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली होती.
सीसीटीव्ही, वाय-फायने यंत्रणा अधिक स्मार्ट करणार
शामजी बापू चौक येथे स्मार्ट सिग्नल पोलच्या उभारणीचे काम सुरू आहे. यामध्ये फिरता सीसीटीव्ही कॅमेरा, चार डेकोरेटिव्ह लाईट असतील. विशेष म्हणजे हा स्मार्ट डेकोरेटिव्ह पोल वाय-फायने जोडला जाईल आणि त्यांचे नियंत्रण पी-दक्षिण वॉर्डमध्ये असेल. जर पालिकेला कोणती महत्त्वाची सूचना नागरिकांना द्यायची असेल ती डिजिटलच्या माध्यमातून देता येईल, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.


























































