मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; बीडमधील नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा केली. यावेळी बीड जिह्यातील गेवराई तालुक्यातील रुई येथील मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या दाम्पत्याला मानाचे वारकरी म्हणून मान मिळाला. समाजातील सर्व घटकांतील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर असे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी श्री विठ्ठलाला घातले. शासकीय महापूजेनंतर मानाचे वारकरी ठरलेल्या नवले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी श्री विठ्ठल–रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले असणारच, पण विठ्ठलाच्या मनातही एक प्रश्न निर्माण झाला असेल आणि तो त्याने ‘एकनाथा’ला विचारला असेल… यवतमाळचे शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी रेखाटलेले हे प्रश्नार्थक काव्यचित्र!

सांग एकनाथा

वारीमध्ये भक्तांच्या 

ही का चर्चा उठे,

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे?

महामारीच्या संकटी

तो कर्ता म्हणून आला,

महाराष्ट्राला अवघ्या 

सावरता तो झाला,

दिल्लीश्वर झुकला जिथे

वैरी आपुला तू का उठे? 

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे?

जो उरी समावला

त्याने वार पाठी केला,

विश्वासला डोळे मिटुनी

तिथे भ्रम दूर झाला,

मृग नक्षत्राचे तोंडी

त्याची ‘वर्षा’ कशी सुटे?

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे?

सांग मला तू खरे

तुला काय कमी दिले?

विश्वासाने देताना त्याने

काय कमी केले?

आनंदी तू जिथे 

अवघा महाराष्ट्र रुठे,

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे?

तू दर्शनासी आला इथे

पण माझे आशीर्वाद तिथे,

घात विश्वासाचे करे

त्याचे भांडे नेहमी रिते,

आपुले लढे अपुल्यांशी

हर्ष परकीय मनी लुटे,

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे?

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे?