डिझेलवरील निर्यात शुल्कात भरघोस वाढ, जागतिक अस्थिरतेमुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधनाबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एएनआय (ANI) च्या वृत्तानुसार, सरकारने डिझेलवरील निर्यात शुल्कात (Export Duty) दुपटीहून अधिक वाढ केली असून जेट इंधनावरील (ATF) शुल्कातही मोठी वाढ करण्यात आली आहे.

डिझेल आणि एटीएफवरील शुल्क वाढले

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर २१.५ रुपयांवरून थेट ५५.५ रुपये करण्यात आले आहे. यासोबतच विमान इंधनाच्या (ATF) निर्यात शुल्कातही वाढ करण्यात आली असून, ते प्रति लिटर २९.५ रुपयांवरून ४२ रुपये करण्यात आले आहे. दरम्यान, पेट्रोलवरील निर्यात शुल्क पूर्वीप्रमाणेच शून्य ठेवण्यात आले आहे. हे नवे दर तात्काळ प्रभावाने लागू झाले आहेत.

ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती सध्या प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास असून मध्य पूर्वेतील संकटामुळे पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढत असताना देशांतर्गत बाजारपेठेत डिझेल आणि विमानांच्या इंधनाची कमतरता भासू नये, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे, असे बोलले जात आहे.