सोशल मीडिया जपून हाताळा; तात्काळ गुन्हा दाखल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील सामूहिक अत्याचाराच्या (मॉब लिंचिंग) घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत.  सामूहिक हिंसा अथवा सोशल मीडियातून प्रक्षोभक मेसेज किंवा व्हिडीओ क्लिप व्हायरल करणार्‍या व्यक्तींच्या विरोधात दोन धर्म-भाषेत द्वेष पसरवल्याच्या आरोपावरून थेट गुन्हा दाखल करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. जमावाकडून होणार्‍या हत्या रोखण्यासाठी राज्यातील पोलीस अधीक्षकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात तसेच देशाच्या काही भागांत मुले चोरण्याच्या संशयावरून तसेच गोमांसाच्या तस्करीच्या संशयावरून जमावाने काही जणांची हत्या केली होती. धुळे जिह्यात मुलेचोरीच्या संशयावरून भटक्या नाथ गोसावी समाजातील पाचजणांची जमावाने क्रूर हत्या केली होती. याबाबत तहसीन पुनावाला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने शासन आदेश जारी केले आहेत. सामूहिक हिंसा (मॉब व्हायलन्स) व सामूहिक अत्याचार(मॉब लिंचिंग) रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. एखादा जमाव कायदा हातात घेऊन हिंसा घडवण्याची शक्यता निर्माण झाल्यास स्वतःचे अधिकार वापरून जमावाला पांगवण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत.  

…तर पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई

अशा घटनांमध्ये तक्रार दाखल झाल्यास पीडित व्यक्ती किंवा त्या कुटुंबीयांना आणखीन त्रास होणार नाही याची काळजी नोडल अधिकार्‍यांनी घ्यावी. यामध्ये निष्काळजीपणा केल्यास संबंधित पोलीस अधिकार्‍यावर कारवाई होईल असे आदेशात नमूद केले आहे.  

नोडल अधिकार्‍याची नियुक्ती

जमावाकडून होणार्‍या हत्या रोखण्यासाठी शहरातील पोलीस उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस उपायुक्त (डीसीपी) पदावरील अधिकार्‍यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

विशेष कृती दलाची स्थापना

सामूहिक हिंसा, दोन समाजांत द्वेष पसरवणार्‍या व्यक्ती, अफवा पसरवणारे लोक, प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांचा अहवाल तयार करण्यासाठी नोडल अधिकार्‍यांना विशेष कृती दल स्थापन करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.  

सोशल मीडियावर लक्ष

सोशल मीडियावरून प्रक्षोभक किंवा बेजबाबदार मेसेज किंवा व्हिडीओ व्हायरल करणार्‍या व्यक्तीच्या विरोधात धर्म, भाषा व वंशाच्या आधारावर दोन समाजांत द्वेष पसरवण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.