मराठीचा वापर न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी कार्यालये तसेच महापालिकांना वारंवार सूचना दिल्यानंतरही प्रशासकीय कामात मराठीचा वापर केला जात नाही. लॉकडाऊनच्या काळातील सूचनाही इंग्रजीतूनच प्रसिद्ध करण्यात आल्या. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. यापुढे मराठीचा वापर न केल्यास सरकारी अधिकाऱयांची वेतनवाढच रोखली जाईल, असे आदेश राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून काढण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात मराठी अनिवार्यच असायला हवी असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे. त्यानुसार सरकारी आदेश, परिपत्रके यात मराठी भाषेचाच वापर व्हायला हवा. यासाठी सरकारकडून अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मधल्या काळामध्ये लॉकडाऊनमधील उपाययोजनांच्या सूचना, कोरोना संदर्भातील सूचना याही इंग्रजीतच प्रसिद्ध झाल्या होत्या. याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. यापुढे कोणतेही आदेश किंवा परिपत्रक मराठीतच प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत, असे सुभाष देसाई म्हणाले.

भाषांतराची अडचण येणार नाही

सरकारी कामकाजात मराठीचा वापर अनिवार्य करण्याबाबत मंगळवारी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेतली. मंत्रालयात कर्मचाऱयांची संख्या कमी असल्यामुळे असे होत होते असे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. त्यानुसार यासंदर्भात संबंधित कर्मचाऱयांनाआदेशांचे मराठी भाषांतर करण्यास सांगण्यात आले आहे. मराठी भाषा विभागाकडूनही यासाठी तशी तजवीज केली जाईल, यामुळे भाषांतराची अडचण येणार नाही, असे सुभाष देसाई म्हणाले.

मराठीचा वापर नसल्याबाबत तीव्र नाराजी

मराठीचा वापर होत नसल्याबाबत परिपत्रकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यासंबंधी वारंवार सूचना देण्यात आल्या तसंच यामध्ये येणाऱया अडचणींसंदर्भात उपाययोजनादेखील सूचवल्या आहेत. तरीसुद्धा शासकीय कार्यालयातून काटेकोरपणे मराठी भाषेचा वापर केला जात नाही. मंत्रालयीन विभागांचे शासन निणऱय इंग्रजी भाषेत असल्याचे दिसून येत असल्याबाबत या परिपत्रकाद्वारे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

शिस्तभंगाची कारवाई

सूचनांचे पालन न करणाऱया संबंधित अधिकाऱयांविरोधात शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठी भाषेचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱया अधिकारी आणि कर्मचारी यांना लेखी ताकीद देणे, गोपनीय अहवालात नोंद घेणे, ठपका ठेवणे आणि एका वर्षाकरिता वेतनवाढ रोखणे अशा कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी

महानगरपालिकांकडून नैसर्गिक आपत्तींची माहिती देताना व त्यासंदर्भात नागरिकांना सूचना देताना मराठी भाषेचा वापर अधिकाऱयांमार्फत केला जात नसल्याच्या तक्रारी ‘आपले सरकार’ प्रणालीमार्फत तसंच अन्य विविध माध्यमातून करण्यात आल्या.