
समाजात विद्या, धन आणि सात्त्विकता अशा तीन शक्ती आहेत. या शक्तींचा योग्य उपयोग झाल्यास देश आणि समाजाचा विकास साधता येईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे वृत्तांकन करताना काही प्रसारमाध्यमांनी राज्यपालांचे चुकीचे वक्तव्य प्रसिद्ध केले होते. त्याचा संबंधितांनी तीक्र शब्दांत इन्कार केला असून राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते विद्या, धन आणि सात्त्विक शक्ती वाईट व्यक्तीच्या हाती गेल्यास समाज अधोगतीकडे जातो. मात्र ती गुणी व्यक्तीच्या हातात असेल तर त्यातून समाजाचा विकास साधला जातो आणि तोच समाजाचे संरक्षण करतो. विद्या ही दान केल्यास ती वाढतच जाते. जुन्या काळात महिलांना देवीचे स्थान देऊन त्यांची पूजा केली जात होती, मात्र आज तो आदर राहिलेला दिसत नाही. विद्यार्थ्यांना चांगल्या संस्कारांचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


























































