श्रीगोविंदमहाराज उपळेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

अध्यात्म जगतात ‘फलटण’चा नावलौकिक वाढविणाऱया श्रीगोविंदमहाराज उपळेकर यांच्या अवतार कार्याविषयीचा हा लेख.

श्री कृष्णदेवांची ख्याती विरक्त सत्पुरुष म्हणून सर्वदूर पसरली होती. आसक्त जगापासून अलिप्त राहून, भय-भीतीची तमा न बाळगता अन्न-पाण्यावाचून, रानावनांतून बिनदिक्कत फिरणारे, लौकिकदृष्टय़ा वेड पांघरून स्वतःतील देवत्व उघड न करता, ऊन-वारा, पाऊस-थंडी यांची तमा न बाळगणारे श्रीकृष्णदेव सर्वसामान्यांना वेडगळ भासत होते. मात्र त्यांच्या अंतर्यामी संतत्व, सिद्धपण विलसत होते याची अनेकांना कल्पना नव्हती. म्हणूनच फलटणच्या उपळेकर कुटुंबीयांस गोविंदकाकांचे वारंवार पुसेसावळीस जाणे खटकू लागले. घरातील कर्तासवरता मुलगा कुण्या विदेही अवलियाच्या मागे लागणे त्यांना मंजूर नव्हते. त्यात गोविंदकाका प्रपंच-परिवाराचा त्याग करून, घरदार सोडून थेट श्रीकृष्णदेवांच्या सहवासात राहण्यास गेल्याचा संताप आल्यामुळे मंडळींनी काकांना पुसेसावळीहून घरी आणले आणि खोलीत डांबून ठेवले. असे केल्याने गोविंदकाकांचे त्यांच्या गुरूंवरील प्रेम कमी होईल असा त्या सर्व मंडळींचा कयास होता.

खरे पाहता उपळेकर कुटुंबीयांच्या विचारातही उणीव नव्हती. गोविंदकाका विवाहित असल्यामुळे त्यांच्यावर पत्नी, मुले व प्रपंचाची तसेच कुटुंबाची जबाबदारी होती. लष्करातील नोकरीमुळे उत्पन्न चांगले होते. प्रपंच उत्तम रीतीने सुरू होता. अशा वेळी एका अवलियाच्या मागे लागून काकांचे प्रपंचाकडे दुर्लक्ष झाले असते तर त्यांच्या पाठी कुटुंबाचे पोषण कुणी केले असते या विचारानेच उपळेकर कुटुंबीय गोविंदकाकांना कृष्णदेवांपासून दूर करू पाहत होते, गुरुभक्ती संपुष्टात आणू पाहत होते. कुटुंबातील प्रत्येक जण, हितचिंतक, मित्रआप्तेष्ट गोविंदकाकांना नाना प्रकारे समजावत होते, तरीही काकांची गुरुभेटीची ओढ कमी झाली नाही. सर्व जण गोविंदकाकांना परोपरीने विनवत असत ‘‘डॉक्टर, वेडेपणा करू नका. मुलंबाळं, बायको-संसार सोडून देवाधर्माच्या अन् फकीर संन्याशाच्या मागे लागून आयुष्य बरबाद करू नका. परटाच्या नादाला लागून आयुष्याची राखरांगोळी करून घ्याल. स्वतःला सावरा, पुन्हा माणसांत या. पै-पैसा जोडा. प्रपंच करा.’’ आदी युक्तीच्या चार गोष्टी सांगत असत, पण गोविंदकाकांनी हेका व हट्ट सोडला नाही. ‘‘मी गुरूंचे चरण त्यागून कुठेही जाणार नाही!’’ हेच पालुपद ते आळवू लागले. घरच्यांनी त्यांना उपाशी ठेवूनही पाहिले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. गोविंदकाकांचा गुरुभेटीचा ध्यास दिसामासाने इतका वाढता झाला की, त्यांच्या वागण्या-बोलण्यात असंबद्धता येऊ लागली. त्यामुळे काकांना वेड लागले आहे असा काही मंडळींचा ग्रह झाला. त्यांच्या हट्टापायी घरच्या मंडळींनी मॅजेस्ट्रीट साहेबांस अर्ज करून काकांना मनोरुग्णांच्या इस्पितळात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील डॉ. भडकमकर यांनी काकांना तपासले व त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा काकांनी दिलेली योग्य व चोख उत्तरे ऐकून त्यांच्या मनावर कसलाही परिणाम न झाल्याचा निर्वाळा देत डॉक्टरांनी काका तंदुरुस्त असल्याचे सांगितले. गोविंदकाका निश्चिंत झाले. आता गुरू श्रीकृष्णदेवांची भेट घेण्यासाठी कुणी मोडता वा अडथळा घालणे शक्य नाही. तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा श्रीकृष्णदेवांचे दर्शन घडेल या कल्पनेने गोविंदकाकांना आनंद झाला. पुसेसावळीला जाण्याच्या कल्पनेने ते मनोमन खूश झाले.

अवघ्या तिशीतच गोविंदकाकांनी विरक्तीच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले. संसार, संतती, संपत्ती आणि सुख या सर्वांवर एका क्षणात पाणी सोडून डोक्याला फडके व देहावर कफनी गुंडाळून ते प्रपंच त्यागते झाले. गोविंदकाका आपल्यापाशी परतल्याचे पाहून श्रीकृष्णदेव आनंदित झाले खरे. मात्र येथून पुढे काय सहन करावे लागणार याची गोविंदकाकांना पुसटशी कल्पनाही नव्हती. त्यांच्या परीक्षेची वेळ पावलोपावली येती झाली. पुसेसावळीच्या डोहामध्ये गुरुआज्ञेनुसार काकांना गुरुदेवांसोबत तासन्तास बैठक घालून बसावे लागे. उन्हाने पावले करपवणाऱया रखरखीत मातीतून मैलोन्मैल चालावे लागे. उपाशीपोटी काटय़ाकुटय़ांतून जाताना अनवाणी पावले रक्तबंबाळ होत. मात्र काका सारे काही सहन करीत. कधी कधी भिक्षेत मिळालेला भाकरतुकडा श्रीकृष्णदेव स्वतः खात व गोविंदकाकांना उपाशी ठेवत तर कधी कधी त्यांना रात्री झोपू देत नसत. एकदा श्रीकृष्णदेवांनी गोविंदकाकांना एका पायावर उभे राहावयास सांगितले होते. अशा एकाहून एक खडतर कसोटय़ांमधून गोविंदकाकांना तावूनसुलाखून बाहेर काढण्यासाठी कृष्णदेवांनी बरेच सायास केले अन् गोविंदकाका प्रत्येक आव्हानाला तोंड देत ‘असाध्य ते साध्य’ करते झाले. याच कालावधीत गोविंदकाकांचा लौकिक प्रपंच झाकोळता झाला. एका मुलाचे पोरवयात निधन झाले. संपत्तीची धुळधाण उडाली. साध्वी पत्नी अकाली वनवास सहन करीत जननिंदेची आणि उपेक्षेची संकटे झेलीत होती.

गोविंदकाका नामक ‘सुवर्ण’तत्त्वाला झळाळून उठण्यासाठी सहन कराव्या लागणाऱया या कसोटीच्या झळा पाहून भोवतालची सहृदय मंडळी दुःखी होत आणि श्रीकृष्णदेवांना, ‘‘देवा, या ब्राह्मणाचा इतका छळ का करता?’’ असे विचारून सात्त्विक संताप व्यक्त करत. अशा वेळी गोविंदकाका निश्चल, निर्विकार असत. त्यांचा त्यांच्या गुरूंवर, श्रीकृष्णदेवांवर पूर्ण विश्वास होता आणि एके दिवशी गुरुदेवांवरील हाच विश्वास फळाला आला. श्रीकृष्णदेवांनी काकांना जवळ बोलावले. त्यांच्या गालावरून हात फिरवत श्रीकृष्णदेव म्हणाले, ‘‘गोइंदा, आता तू तुझ्या गावी जा. मायेची लेकरं तुझी वाट बघताहेत. आता संसार कर. सगळी कर्तव्यं निभव.’’ श्रीकृष्णदेवांनी गोविंदकाकांना निरोप देत फलटणला धाडून दिले. त्यामुळे गोविंदकाका गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून माघारी परतले. मात्र त्यानंतर थोडय़ाच दिवसांत श्रीकृष्णदेवांनी पुसेसावळीच्या डोहात जलसमाधी घेतली अन् अवतारकार्य संपविले. श्रीगुरुदेवांचे एकाएकी निघून जाणे गोविंदकाकांसाठी विलक्षण दुःख देणारे ठरले. यातूनच पुढे निरपेक्ष वृत्तीने प्रपंच धर्माचे पालन करणारे गोविंदकाका विरक्त वृत्तीने परमार्थ मार्ग आक्रमू लागले. जो कुणी भेटेल त्यास श्रीकृष्णदेवांची महती आणि शिकवण सांगणाऱया गोविंदकाकांच्या हातून अनेक अलौकिक लीला घडल्या. त्यांच्यातील सिद्धतत्त्वाची प्रचीती अनेकांना अनेकदा आली. यातूनच पुढे गोविंदकाकांचे नगर परिसरात जाणे झाले. इथे त्यांना माऊली अन् ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचा लळा लागला. बागोबा कुकडे, मिरीकर, पारखे, श्रोत्री अशा अभ्यासू साधकांसमवेत नगर येथे सत्संग मंडळ स्थापन झाले. बागोबा कुकडे यांना गोविंदकाकांनी अनुग्रह दिला. दरम्यान, काकांच्या हातून ‘श्रीज्ञानेश्वर सुबोधिनी’ या ग्रंथाचे आणि श्रीकृष्णदेवांच्या अलौकिक चरित्राचे लेखन झाले. सोबतच आमोह, ज्योती, समोपचार, परिहार व नित्यपाठ ही पुस्तकेही लिहून झाली.

8 ऑक्टोबर 1974 या दिवशी देह विसर्जित करणाऱया या ‘फलटण’च्या सिद्ध सत्पुरुषाचे अप्रतिम चरित्र नामवंत चित्रकार कै. डी. डी. रेगे यांनी लिहिलेले आहे.
(उत्तरार्ध)

[email protected]