कॉ. पानसरे हत्या प्रकरण; संशयित बारा आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत महाविकास आघाडी सरकार गंभीर आहे. पोलीस तपास अधिक गतिमान करण्यासाठी प्रत्येक आठवडय़ाला आढावा घेणार आहे. तसेच या गुन्ह्यातील संशयित बाराही आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

कॉ. पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाली तरीही मुख्य सूत्रधार अद्याप सापडलेले नाहीत. उमा पानसरे, आर. के. पवार, सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, अतुल दिघे, अनिल चव्हाण, शिवाजी परुळेकर यांच्या शिष्टमंडळाने आज गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन तपासाबाबत नाराजी व्यक्त केली.

गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, पानसरे हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. एसआयटी पथकाने कटातील संशयितांवर कारवाई केली आहे. शस्त्रांसह वाहनाच्या शोधासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आपण स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, तपासी अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून आढावा घेतला आहे. पानसरे हत्येच्या चौकशीत निष्पन्न होणाऱ्या माहितीबाबत सरकार गंभीर आहे. तपासात कोणत्याही प्रकारची तांत्रिक उणीव राहू नये यासाठी सरकारकडून दक्षता घेण्यात येत आहे.

अंनिसचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, विचारवंत प्राचार्य कलबुर्गी, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मारेकऱयांच्या चौकशीत काही हिंदुत्ववादी संघटनांसह प्रमुखांची नावे निष्पन्न होऊनही येथील तपास यंत्रणा पाच वर्षे मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचू शकलेली नाही. मारेकरी विनय पवार, सारंग आकोलकरचा शोध घेण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याची खंत गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी व्यक्त केली.