
हैदराबादमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटले. महिलांविरोधातील अशा घृणास्पद गुह्यांत जलद न्यायासाठी भादंवि आणि फौजदारी दंड संहितेत आवश्यक ती दुरुस्ती करण्यास सरकार तयार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली.
हैदराबादेतील पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार व तिची हत्या करून मृतदेह जाळण्याच्या अत्यंत क्रूर घटनेविरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा मुद्दा सोमवारी लोकसभेत शून्य प्रहरमध्ये उपस्थित झाला. या वेळी तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचे नामा नागेश्वर राव यांनी घटनेतील नराधमाला सहा तासांत जेरबंद केल्याची माहिती दिली. अशा प्रकरणांत महिनाभरात न्याय मिळावा, यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री रेड्डी यांनी घटनेचा निषेध केला आणि केंद्र सरकार याबाबत अत्यंत गंभीर असून कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करण्यास तयार आहे, असे सांगितले.
पीडित महिलांना वेळीच न्याय मिळवून देण्यासाठी सर्व राज्ये आणि पोलिस दलांशी पत्रव्यवहार केला आहे. कायद्यातील दुरुस्तीबाबत तज्ञांसोबत चर्चा केली जाणार आहे. सरकारने 112 हा विशेष हेल्पलाईन नंबरही कार्यान्वित केला आहे, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.





























































