विमानाच्या जीपीएसमध्ये छेडछाड; 2 वर्षांत 1,951 वेळा बनावट सिग्नल पाठवले

देशात उड्डाण करणाऱया विमानांच्या जीपीएस सिस्टममध्ये छेडछाड करण्याच्या घटनेत वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांत 1 हजार 951 वेळा छेडछाड केल्याच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. विमानाला अचूक स्थान, दिशा आणि उंची सांगण्याचे काम जीपीएस सिस्टम करत असते. जीपीएस डेटामध्ये बिघाड झाल्यास विमानाची दिशा बदलू शकते. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचीही शक्यता असते.

काही दिवसांपूर्वीच दिल्ली, मुंबई, कोलकाता, अमृतसर, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई विमानतळावर जीपीएस स्पूफिंग व छेडछाड केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या 12 दिवसांत झालेल्या जीपीएस स्पूफिंगच्या घटना सरकारने मान्य केल्या आहेत. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टममध्ये छेडछाड झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमान सेवा 12 तासांपेक्षा जास्त काळ प्रभावित झाली होती.

ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम काय आहे?

ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम ही एअर ट्रफिक कंट्रोल सेवेशी संबंधित एक कॉम्प्युटरिंग नेटवर्क सिस्टम आहे. या सिस्टमद्वारे दररोज हजारो टेक्स्टआधारित मेसेज पायलट, ग्राऊंड स्टाफ, अन्य विमानतळांवरील रिअर टाईममध्ये पाठवले जातात. यात विमानाचा संपूर्ण मार्ग, उंची, इंधनची माहिती असते.