
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कलम 370 हटविल्यानंतर पाचव्या दिवशीही कश्मीर खोऱ्यात शांततापूर्ण वातावरण आहे. त्यातच सोमवारी असलेल्या ईद-उल-अजहाच्या निमित्ताने जम्मू-कश्मीर सरकार येथील नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याच्या कामात गुंतले आहे. ईद मुबारक म्हणून कश्मीरात राज्य सरकार आपल्या वाहनांद्वारे लोकांच्या घरोघरी भाजी, चिकन, एलपीजी गॅस, अंडी वगैरे वाटप करत आहे.
सरकारने आपल्याजवळ साधारण 65 दिवस पुरेल एवढा अत्यावश्यक सामानाचा स्टॉक जमा करून ठेवला आहे. त्यात 65 दिवसांसाठी गहू, 55 दिवस पुरेल एवढे तांदूळ, 17 दिवसांइतके मटण, एक महिना पुरेल एवढे चिकन, 35 दिवसांसाठी केरोसीन, एक महिन्यापुरते एलपीजी गॅस आणि 28 दिवसांचे पेट्रोल-डिझेल आहे. लोकांना आपल्या परिजनांशी बोलता यावे यासाठी राज्य सरकारने ईदच्या निमित्ताने किमान 300 टेलीफोन बूथ बनवले आहेत. त्याद्वारे स्थानिक लोकांना ईद मुबारकचे फोन करता येतील.



























































