थकीत वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हा परिषदेत बेमुदत उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे थकीत वेतन त्वरित मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या अहमदनगर जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. कर्मचार्‍यांना 2007 पासूनचा थकीत राहणीमान भत्ता मिळावा, थकीत भविष्यनिर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा करावी अशीही मागणी आंदोलकर्त्यांनी केली.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ऑनलाईन पेमेंट देण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यासाठी आवश्यक असलेली माहिती देण्याकामी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडून विलंब होत आहे. गेल्या दहा ते बारा महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रक्रियेमुळे कर्मचार्‍यांना विनावेतन काम करावे लागत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. या उपोषण आंदोलनात युनियनचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे, जिल्हा सरचिटणीस दिलीपराव डिके, बाबासाहेब गोर्डे, अप्पासाहेब पवार, बाबासाहेब कदम आदींसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.

शासनाने ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया राबवताना ती प्रत्यक्ष कार्यान्वित होईपर्यंत कर्मचार्‍यांना वेतन देऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही. तरी ऑक्टोबर 2017 पासून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन थकवण्यात आले आहे. राहणीमान भत्त्याबाबतही शासनाने 2007 मध्ये स्पष्ट आदेश काढलेले आहेत. सदर आदेशात राहणीमान भत्ता न देणार्‍या ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश देण्यात आले आहेत. तरीही 2007 पासून नगर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी राहणीमान भत्ता दिलेला नाही. ही सर्व रक्कम कर्मचार्‍यांना एकरकमी मिळावी अशी मागणी उपोषणावेळी करण्यात आली.