
एका ग्रामसेवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यातील भोकरदन येथे घडली आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. संतोष भिमराव पाटील (31) (रा.जोमाळा) असे आत्महत्या करणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
संतोष हे कोदोली येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी 24 ऑगस्ट रोजी रात्री संतोष यांनी आपल्या पुखराज नगरातील राहत्या घरी गळफास घेतला. पत्नीने आरडाओरड केल्यामुळे शेजारी-पाजारी लोकांनी धाव घेत घरचा दरवाजा तोडला. त्यांना खाली काढून उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. आत्महत्येचे अद्याप कारण स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. बुधवारी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या मुळ गावी जोमाळा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक चार वर्षीय मुलगी, आई वडील, एक भाऊ असा परीवार आहे.



























































