आजीसाठी काहीपण! आजीच्या इच्छेसाठी त्यांनी काढली हेलिकॉप्टरमधून वरात

हौसेला मोल नसतं असं म्हणतात. त्यात जर एखाद्या जेष्ठ व्यक्तिची इच्छा असेल तर लोक हमखास ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात इतर वेळी ही बाब सामान्य आहे. पण, सद्यपरिस्थितीत एकिकडे कोरोनामुळे लग्नसमारंभ साजरे करताना अनेक नियम आणि निर्बंधांचं पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, असं असूनही काही लोक आपली हौस पूर्ण करताना दिसत आहेत. अशाच एका हौशी नातवंडांनी आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून वरात काढली आहे.

आजीची इच्छा नातवंडांनी केली पूर्ण

राजस्थानातील कोटा येथे राहणाऱ्या अशोक मालव यांच्या दोन्ही मुलांचा विवाह नुकताच पार पडला. पंकज आणि ललित अशा त्यांच्या दोन्ही मुलांचे विवाह अनुक्रमे कोमल आणि रश्मिता या तरुणींशी झाले.

अशोक मालव यांच्या म्हणण्यानुसार, या मुलांच्या आजीची नातवंडांची वरात हेलिकॉप्टरने यावी अशी इच्छा होती. त्यामुळे हा विवाह ज्या गार्डनमध्ये झाला, तिथे आणि मालव यांच्या घराजवळ एक तात्पुरत्या स्वरुपातचं हेलिपॅड बनवण्यात आलं.

लग्न, रिसेप्शन सगळं पार पडलं आणि ही दोन्ही जोडपी हेलिकॉप्टरमध्ये बसली. हे हेलिकॉप्टर उडून मालव यांच्या घराजवळच्या हेलिपॅडवर उतरलं. दोन्ही नातसुना आजीच्या इच्छेप्रमाणे हेलिकॉप्टरमधून घरी आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या