विजयीवीरांचे मायदेशात ग्रॅण्ड वेलकम; ढोलताशांचा गजर, तुतारीचा नाद अन् फुलांचा वर्षाव

ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवणाऱया हिंदुस्थानच्या अजिंक्यवीरांचे मायदेशात गुरुवारी ढोलताशांचा गजर आणि फुलांचा वर्षावासह जंगी स्वागत करण्यात आले. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr, कर्णधार अजिंक्य रहाणे, उपकर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ या मुंबईकरांसह रिषभ पंत, मोहम्मद सिराज, टी. नटराजन या खेळाडूंचे मायदेशात ग्रॅण्ड वेलकम करण्यात आले.

सोसायटीकडून कर्णधाराचा सन्मान

टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याचा त्याच्या सोसायटीकडून स्पेशल सत्कार करण्यात आला. त्याच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर, फुलांची उधळण आणि तुतारीद्वारे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूचे स्वागत झाले तसेच यावेळी अजिंक्यने एक किस्सा सांगितला.

पत्नी राधिका म्हणाली, मायदेशात येताना चांगले कपडे घालून ये. त्यावेळी मला वाटले काय फरक पडतो. तेव्हा ती म्हणाली, आर्या तुला बघून खूश होईल. पण येथे आल्यानंतर मला सरप्राईज मिळाले. स्वागताने भारावून गेलो, असे अजिंक्य रहाणे म्हणाला.

विमानतळावरून थेट दफनभूमीत

युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयपीएलपासून थेट ऑस्ट्रेलिया दौऱयापर्यंत सातत्याने क्रिकेट खेळला. या कालावधीत त्याला पुटुंबीयापासून दूर रहावे लागले. याचदरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले. पण तो ऑस्ट्रेलियन दौरा अर्धवट सोडून मायदेशात परतला नाही. त्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही तो उपस्थित राहू शकला नाही.

siraj-ahmad

मात्र ऐतिहासिक मालिका विजयानंतर मोहम्मद सिराज मायदेशात परतला आणि विमानतळावरून थेट खैरताबाद येथील कब्रस्तानमध्ये पोहोचला. यावेळी वडिलांच्या आठवणींने त्याचा कंठ दाटून आला होता.

एमसीएकडून गौरव

रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर व पृथ्वी शॉ हे मुंबईत दाखल होताच त्यांचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पदाधिकाऱयांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील, अजिंक्य नाईक, अमित दाणी व उन्मेश खानविलकर हेही उपस्थित होते.

शार्दुल ठाकूरचे माहीममध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात पालघर जिल्ह्याच्या शार्दुल ठाकूरने अष्टपैलू कामगिरी करून आपले मोलाचे योगदान दिले होते. शार्दुलच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शार्दुल गुरुवारी दुपारी 2 वाजता पालघर जिल्ह्यातील माहीम गावात घरी पोहचला. यावेळी त्याच्या मित्रांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्याचे स्वागत केले.

यावेळी शार्दुलची आई हंसा ठाकूर व वडील नरेंद्र ठाकूर यांनी त्याचे औक्षण केले. माहीम येथील घरी शार्दुल येणार याबाबत कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र तरीही शार्दुलसोबत क्रिकेट खेळणारे त्याचे मित्र त्याचे स्वागत करण्यासाठी त्याच्या घरी आले होते. हिंदुस्थानी संघाचे स्वप्न पाहणारा शार्दुल पहाटे 4 वाजता पालघरच्या माहीम गावातून मुंबई असा दररोज रेल्वेने प्रवास करायचा.

शार्दुलच्या  अष्टपैलू कामगिरीने आजवर त्याने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना त्याचे वडील निवृत्त शिक्षक नरेंद्र ठाकूर यांनी ‘सामना’कडे  व्यक्त केली.

अश्विन, सुंदर, अरुण उद्या येणार

रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे सध्या दुबईत आहेत. उद्या पहाटे ते हिंदुस्थानात पोहोचतील अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली. टी. नटराजन गुरुवारी बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर तामीळनाडू येथील गावाच्या दिशेने निघाला. रिषभ पंतही पहाटे नवी दिल्ली विमानतळावर पोहोचला.

आपली प्रतिक्रिया द्या