दिव्या देशमुखचे भव्य स्वागत

नागपूरची लेक, ग्रॅण्डमास्टर आणि बुद्धिबळची विश्वराणी दिव्या देशमुखचे बुधवारी रात्री 9.15 वाजता विमानतळावर तिचे जल्लोषात आणि जोशात स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या जगज्जेतीला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

दोन दिवसांपूर्वी बुद्धिबळाचे जगज्जेतेपद जिंकल्यानंतर अवघ्या जगात दिव्याच्या कामगिरीचा जयघोष सुरू होता. सारे तिची आतुरतेने वाट पाहत होते. आई डॉ. नम्रता देशमुखसह दिव्या हातात चकाकती ‘वर्ल्ड कप ट्रॉफी’ घेऊन विमानतळ परिसरातून बाहेर पडताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

बुधवारी रात्री महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने तिचा विमानतळावर आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्याच्या कुटुंबीयांसह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी आणि दिव्याचे चाहते उपस्थित होते. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 जिंकून परतल्यावर नागपुरात तिचे हे पहिलेच स्वागत आणि सत्कार होता. दिव्या देशमुख बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकणारी पहिली हिंदुस्थानी महिला ठरली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतही अद्याप कुठलीच हिंदुस्थानी स्पर्धक पोहोचली नव्हती.

यावेळी प्रसारमाध्यमांशी भावना व्यक्त करताना दिव्याने हा करिअरमधील सर्वोत्तम व ऐतिहासिक विजय असल्याचे सांगून, स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. ही स्पर्धा भविष्यातील आपल्या करिअरमधील मैलाचा दगड असल्याचे सांगताना तिने विजयाचे श्रेय सदैव पाठीशी असलेल्या आई-वडील, प्रशिक्षक व तमाम नागपूरकर चाहत्यांना दिले.

महाराष्ट्र सरकारतर्फे नागरी सत्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुख हिचा महाराष्ट्र सरकारतर्फे सत्कार करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार स्थानिक प्रशासन तयारीला लागले आहे. येत्या शनिवार, 2 ऑगस्टला तिचा सत्कार केला जाणार आहे.