
युवा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने 7.5 गुण मिळवत 32 व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या खेळाडूंनी पहिले तिन्ही क्रमांक पटकावित वर्चस्व गाजविले. यामध्ये आर. प्रज्ञानंद याने 7.5 गुणांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन आणि ग्रँडमास्टर अधिबान बी यांनी बरोबरीच्या सामन्यात प्रत्येकी 7 गुण मिळवित अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या (आयओसीएल) वतीने पीवायसी हिंदू जिमखाना येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत आठव्या फेरीनंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ग्रँडमास्टर अधिबान बी सोबत संयुक्त आघाडीवर असलेल्या आर. प्रज्ञानंद यांनी नवव्या फेरीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता यांच्यावर मात करून स्पर्धेच्या विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन यांनी अंतिम फेरीत ऑइल ऍण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या ग्रँडमास्टर मित्रभा गुहा यांच्याविरुद्धची लढत कल्पक डावपेचांच्या आधारे जिंकली. बरोबरीच्या सामन्यात 7 गुण मिळवून त्यांनी उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत मुरली कार्तिकेयन, अधिबान बी व दीप सेनगुप्ता यांनी प्रत्येकी 7 गुण मिळविले. प्रगत व माध्यम गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक मिळाला. अधिबान बी यांना रौनक साधवानीविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवावा लागला. युवा खेळाडू रौनक साधवानी याला 6.5 गुणांनी पाचवे स्थान मिळाले.
याप्रसंगी रौनक साधवानी यांना ‘सर्वात आश्वासक खेळाडू’ तर मुरली कार्तिकेयन यांना स्पर्धेत ‘उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर अव्यावसायिक खेळाडू श्रेणीत एनआरएलचे केसवरापू उमा साई महेश यांना प्रथम पारितोषिक, तर ‘आयओसी-एओडी’चे एस महातो यांना द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर सांघिक स्पर्धेत विजयी ठरलेल्या आयओसी-ए या संघालादेखील पारितोषिक प्रदान करण्यात आले.


























































