
सामना प्रतिनिधी । खालापूर
लाखो शिवसैनिकांच्या माँसाहेब स्व. सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रमाधाम वृद्धाश्रमात आज आजी-आजोबांची महाआरोग्य तपासणी करण्यात आली. रमाधाममधील एकूण ६० जणांसह खालापूरमधील २०० ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला. तपासणीनंतर रमाधाममधील आजी-आजोबांची प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या आजी-आजोबांना औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचे महाकीट प्रदान करण्यात आले.
मुंबईतील नामांकित हिंदुजा रुग्णालयाच्या सहकार्याने भारतीय कामगार सेनेने या महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. सकाळी १० वाजल्यापासून या आरोग्य शिबिराचा कॅम्प रमाधाममध्ये लागला. रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्यासह हिंदुजा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. जॉय चक्रवर्ती, सीईओ गौतम खन्ना, सुरेश जाधव, प्रतीक मोहंती, सुदेश दर्ठेकर, प्रियांका अय्यंगार, मानसी चौधरी, स्वप्नील खैरनार तसेच भाई शिंदे, विजय पाटील, सुनील पाटील, सुरेश कडव, संजय देशमुख, पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, प्रिया जाधव यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
दर महिन्याला होणार तपासणी
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी सातत्याने घ्यावी लागते. यासाठी रमाधाममधील आजी-आजोबांची दर महिन्याला हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी येऊन आरोग्य तपासणी करतील, अशी माहिती चंदूमामा वैद्य यांनी दिली.
आजी-आजोबांचे आशीर्वाद हीच माझी शिदोरी..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांकडे रमाधाममधील आजी-आजोबांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली तेव्हा डॉक्टरांनी या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, माँसाहेब व शिवसेनाप्रमुखांनी उभारलले हे रमाधाम आणखी नव्या स्वरूपात आकाराला येईल आणि येथील आजी-आजोबांना जास्तीत जास्त सेवा व सुविधा उपलब्ध केल्या जातील. आजी-आजोबांचे आशीर्वाद हीच माझी शिदोरी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.






























































