>>प्रसाद नायगावकर
एका चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह गावातील उसाच्या शेतात आढळून आला. या घटनेने मुलाच्या आजोबांना धक्का बसला. या दुःख असह्य झाल्याने त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गौरव गजानन शिंदे ( वय 4) असे नातवाचे तर अवधूत राजाराम शिंदे ( वय 62)असे त्याच्या आजोबांचे नाव आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दिघडी या गावात घडली आहे.
गौरव शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता. तो गावातच खेळत असेल असे त्याच्या आई वडिलांना वाटले. मात्र, संध्याकाल उलटूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गौरवचा मृतदेह एका उसाच्या शेतात आढळला. त्याचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गौरवचे आजोबा अवधूत शिंदे गौरवला शोधण्यासाठी गावकऱ्यांसोबत फिरत होते. या चार वर्षाच्या चिमुकल्याची हत्या कोणी केली, अशी चर्चा दिघडी गावात सर्वत्र पसरली होती. नातवाच्या मृत्यूचा धक्का अवधूत यांना बसला होता. ते दुःख असह्य झाल्याने रविवारी सकाळी 6 वाजता अवधूत यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.
गौरवच्या हत्येनंतर शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . गौरवच्या आईचा आक्रोश बघून सर्वांच्या डोळे पाणवत आहेत. दरम्यान गौरवच्या हत्येनंतर आजोबानी आत्महत्या केल्याने हळहल व्यक्त होत आहे. तसेच त्यांनी आत्महत्या का केली, याचेही गूढ आहे. त्यामुळे या घटनेबाबत गावात चर्चा सुरू आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहे.
आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत. सर्व बाबी लक्षात या घटनेचा सूक्ष्म तपास सुरु आहे. लवकरच सर्व काही उघडकीस येईल.
– हनुमंतराव गायकवाड,उपविभागीय पोलीस अधिकारी ( उमरखेड )