टोळधाडीने पाकिस्तानची धुळधाण, कीटकनाशकांसाठी हिंदुस्थानला साकडे

718

आधीच आर्थिक चणचण आणि महागाईने बेजार झालेल्या पाकिस्तानवर आता आगळीच आफत कोसळली आहे. पाकिस्तानी शेतांवर आलेल्या नाकतोडय़ांच्या टोळधाडीने पाकिस्तानी शेतकऱयांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. जम्मू-कश्मीरातील 370 कलम हटवल्यानंतर मोठय़ा ऐटीत हिंदुस्थानसोबतच्या व्यापारावर पूर्ण बंदी घातली होती. आता कीटनाकनाशकांच्या खरेदीसाठी हिंदुस्थानची मनधरणी करण्याशिवाय पाकिस्तानपुढे दुसरा कोणताही उपाय उरलेला नाही.

पाकिस्तानचे प्रमुख दैनिक ‘डॉन’च्या वृत्तानुसार इम्रान खान सरकार कीटकनाशकांच्या खरेदीसाठी हिंदुस्थानकडे हात पसरण्याचा विचार करीत आहे; मात्र अन्य हिंदुस्थानी वस्तूंवरील आयातबंदी मात्र पाकिस्तान कायम ठेवणार असल्याचे समजते. कश्मीरला विशेषाधिकार देणारे 370 कलम हिंदुस्थाननने रद्द केल्यावर पाकिस्तान सैरभैर झाला होता. त्यामुळेच इम्रान सरकारने हिंदुस्थानी मालावर पूर्ण आयातबंदी लादली होती.

पाकिस्तानात आणीबाणी
पाकिस्तानी कृषी उत्पादनाचे प्रमुख केंद्र असलेल्या पंजाब प्रांतातच नाकतोडय़ांच्या टोळधाडीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱयांचे तयार झालेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हे संकट टाळण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेत देशात कृषी आणीबाणी घोषित केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या