
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
विविध उत्पादनांवरील जीएसटी कमी केला किंवा रद्द केला तर देशातील महागाई निश्चितच आटोक्यात आणता येईल असा अर्थतज्ञांचा सल्ला केंद्र सरकारने आज प्रत्यक्षात आणला. २७ इंचापर्यंतचा टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसहित १०० वस्तूंवरील जीएसटी कर कमी करण्यात आला. त्यामुळे या वस्तू स्वस्त होणार आहेत. महिलावर्गाच्या मागणीचा आदर राखत सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे.
केंद्रीय वित्तमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काऊन्सिलची २८वी बैठक झाली. त्यात विविध वस्तूंना २८ टक्के जीएसटीच्या स्लॅबमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. २७ जुलैपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. बांबूच्या फ्लोरिंगवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के तर पेट्रोलमध्ये वापरल्या जाणाऱया इथेनॉलवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चपला आणि बुटांवर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे. यापूर्वी तो ५०० रुपयांपर्यंतच्या चपला, बुटांना आकारला जात होता.
जीएसटी रिटर्न भरणेही सुलभ
जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रियाही काऊन्सिलने सुलभ केली आहे. आता जीएसटी रिटर्न भरण्याचा फॉर्म फक्त एका पानाचा असेल. याशिवाय एका महिन्याला तीनऐवजी एकच रिटर्न दाखल करावा लागेल. वार्षिक ५ कोटी रुपये उलाढाल असलेले व्यापारी व व्यावसायिक तिमाही रिटर्न भरू शकणार आहेत.
जीएसटीमुक्त – संगमरवर, राखी, देवदेवतांच्या लाकडी मूर्ती
२८ वरून १८ टक्के – वॉशिंग मशीन, लिथियम आयर्न बॅटरी, व्हॅक्यूम क्लीनर, फूड ग्राइंडर, मिक्सर, स्टोरेज, वॉटर हीटर, हँड ड्रायर, रंग, वार्निश, वॉटर कूलर, दूधाचा कूलर, आइस्क्रीम कूलर, परफ्यूम, टॉयलेट स्प्रे
१२ टक्के – हॅण्डबॅग, दागिन्यांच्या पेटय़ा, पेंटिंगसाठी लाकडी खोके, काचेची कलाकुसर, दगड, सजवलेल्या फ्रेमचे आरसे, हाताने बनवलेले दिवे.
५ टक्के – एक हजार रुपयांपर्यंतची पादत्राणे, ई-बुक्स, हॅण्डलूम चादर, एक हजार रुपयांपर्यंतची टोपी.
अखेर सॅनिटरी नॅपकीनही जीएसटीमुक्त
सॅनिटरी नॅपकीनवरील ‘जीएसटी’ही रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सॅनिटरी नॅपकीनवर १२ टक्के जीएसटी लावला जात होता. त्याविरोधात देशभरात महिला संघटनांनी तीक्र निदर्शने, आंदोलने केली होती. अखेर सरकारला जाग आली असून नॅपकिन जीएसटीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.





















































