
कोरोनाच्या विरोधातील लढय़ाला बळ देण्यासाठी कोरोनावरील औषधे, ऑक्सिजन व वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी कमी करण्यास आज जीएसटी परिषदेने मान्यता दिली आहे. ऑक्सिजन व संबंधित सामग्रीवर 12 ऐवजी 5 टक्के जीएसटी आकरण्यात येईल. मुख्य म्हणजे म्युकरमायकोसिसवरील जीएसटी रद्द करण्यास मान्यता दिली आहे.
कोविडशी संबंधित बहुतांश सामग्रीवरील कर 5 टक्क्यांपर्यंत केल्याने कोरोनावरील उपचार स्वस्त होण्यास मदत होणार आहे. कोरोनावरील औषधे व उपकरणांवरील जीएसटी माफ व सवलत देण्याची आग्रही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत केली होती. या मागणीनंतर केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून मंत्रीगट स्थापन केला होता.
अजित पवार यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटाने केलेल्या शिफारशी जीएसटी परिषदेने मान्य केल्या आहेत. जीएसटी परिषदेची 44 वी बैठक आज झाली. त्या बैठकीत या शिफारस अहवालाला मान्यता देण्यात आली.
कशावरील जीएसटी कमी झाला
- वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिजननिर्मिती आणि संबंधित सामग्रीवर आता 12 टक्क्यांऐवजी 5 टक्के जीएसटी
- मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर-जनरेटर, व्हेंटिलेटर्स, व्हेंटिलेटर मास्क, कॅन्युला, हेल्मेट, बायपॅप मशीन, हाय फ्लो नॅसल कॅन्युला (एचएफएनसी) या साहित्यावर 12 टक्क्यांऐवजी 5 टक्के
- कोविड चाचणी संच -12 ऐवजी 5 टक्के
- पल्स ऑक्सिमीटर – 12 ऐवजी 5 टक्के
- हॅण्ड सॅनिटायझर – 18 ऐवजी 5 टक्के
- टेंपरेचर चेक इक्विपमेंट – 18 ऐवजी 5 टक्के
- रुग्णवाहिका – 28 ऐवजी 12 टक्के
- वीज आणि गॅसवर चालणारी शवदाहिनी – 18 ऐवजी 5 टक्के.
कोरोनावरील औषधे व लस
- रेमडेसिवीर – 12 ऐवजी 5 टक्के
- टोसिलीझुमॅब – जीएसटी रद्द
- अॅम्फोटेरिसिन बी – जीएसटी रद्द
यावरील जीएसटी कायम
- आरटीपीसीआर मशीन – 18 टक्के कायम
- आरएनए एक्स्ट्रक्शन मशीन – 18 टक्के कायम
उपमुख्यमंत्र्यांकडून आभार
जीएसटी परिषदेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वित्तमंत्री व परिषदेच्या अध्यक्षा निर्मला सीताराम व सदस्यांचे आभार मानले आहेत.































































