जी. टी. बी. नगर पुनर्विकासाला गती, प्रकल्पाच्या प्रारूप बृहत् आराखड्याचे सादरीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शीव-कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरु तेग बहादुर नगर (जी. टी. बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रारूप बृहत् आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले.

म्हाडा मुख्यालयात आयोजित बैठकीमध्ये जी. टी. बी. नगरच्या समूह पुनर्विकास प्रकल्पास वेग मिळावा, याकरिता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या परिसरातील सुमारे साडेतीनशे झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी संबंधित यंत्रणांना दोन आठवडय़ांची मुदत दिली. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पात्र झोपडीधारकांची यादी प्रकाशित करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. जेणेकरून झोपडीधारकांची पात्रता निश्चित होऊन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निश्चित व प्रभावी नियोजनाला दिशा मिळू शकेल. सदर प्रारूप बृहत् आराखडा आता पुढील कार्यवाहीसाठी उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात येणार आहे.

1200 रहिवाशांचे पुनर्वसन  

या बैठकीदरम्यान पुनर्विकास प्रकल्पांतील 1200 लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाबाबत, रस्त्याबाबत येणाऱया अडचणी, म्हाडास मिळणारा गृहसाठा, पीएपी सदनिका याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नागरी विमानचालन प्राधिकरणाकडून उद्भवणाऱया अडचणींवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला. याशिवाय, पुनर्वसनातील प्रकल्पबाधितांना देखील योग्य देय लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.