लिफ्टमध्ये चढताना सावधान! लक्ष नसल्यानं खाली पडून एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

टोलेजंग इमारतीच्या कामा वेळी किंवा तांत्रिक बिघाडामुळं अनेकांनी त्यांचे जीव गमावले आहेत. अशीच एक घटना वांद्रे येथील एका १८ मजली एव्हरेस्ट अपार्टमेंटमध्ये मंगळवारी सकाळी घडली आहे. या १८ मजली इमारतीच्या ११व्या मजल्यावर लिफ्टचे दरवाजे उघडले गेले, मात्र लिफ्ट आलीच नव्हती. यावेळी लिफ्ट चढणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या ही बाब लक्षात न आल्यानं तो खाली पडला आणि त्याच्या मृत्यू झाला. राधेश्याम हरिजन असं या व्यक्तीचं नाव आहे.

एव्हरेस्ट अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षकाचं काम करणारे हरिजन सकाळी ८.४५च्या सुमारास ११व्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी गाडीची चावी घेण्याकरता गेला होता. त्यानंतर तो तिथं लिफ्टची वाट पाहत उभा होता. तेवढ्यात ११ व्या मजल्यावर लिफ्टसाठी दरवाजे उघडले. परंतु या लिफ्टचं केबिन हे १७व्या मजल्यावरच थांबून राहिलं होतं. या लिफ्टचा दरवाजा उघडला म्हणून हरिजन यांनी आजूबाजूला न बघता आत प्रवेश केला असता ते लिफ्टच्या पोकळीतून खाली पडले. या घटनेनं इमारतीतील रहिवाशांना धक्का बसला. यानंतर हरिजनला त्वरित वांद्रेच्या भाभा रुग्णालयात हलवण्यात आलं असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.