तणावामुळे वंध्यत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च तणावामुळे प्रजननक्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो, गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात आणि गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो, यासंदर्भात अपोलो फर्टिलिटी, सोलापूरच्या डॉ. मीनल चिडगुपकर यांनी केलेले मार्गदर्शन…

तणावाचा प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. उच्च तणावामुळे नियमित ओव्हुलेशनवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे प्रजननक्षम दिवसांचा अंदाज करणे व गर्भधारणासंदर्भात अडथळा येऊ शकतो. तणावामुळे शुक्राणूंची निर्मिती कमी होऊ शकते आणि दर्जावर परिणाम होऊ शकतो. पुरुष प्रजननक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. उच्च तणावामुळे महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. तणावामुळे ल्युटल फेज कमी होऊ शकतो. ज्यामुळे ओव्हुलेशननंतरच्या काळात यशस्वी रोपण होण्याची शक्यता कमी होते.

गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱया जोडप्यांसाठी…

  • प्रजननकाळ ओळखण्यासाठी, तसेच गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी महिलांनी त्यांच्या मासिकपाळी चक्रावर देखरेख ठेवावी.
  • धूम्रपान आणि अतिप्रमाणात मद्यपानाचा प्रजननक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. धूम्रपान टाळा आणि मद्यपानाचे प्रमाण कमी करा.
  • प्रजननक्षमतेवर परिणाम करणाऱया वैद्यकीय स्थिती ओळखण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ताणतणावावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग

  • नियमित व्यायाम : तणाव कमी करण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज 30 मिनिटे पुरेशा प्रमाणात व्यायाम करा.
  • पुरेशी झोप : तणावापासून आराम मिळण्यासाठी दर रात्री किमान सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या.
  • आरोग्यदायी आहार : मूड प्रसन्न आणि सकारात्मक ठेवण्यासाठी व ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी संतुलित, पौष्टिक आहार सेवन करा. प्रक्रिया केलेले अन्न, शर्करायुक्त पेये व अतिप्रमाणात पॅफिन टाळा.
  • योग : तणाव दूर करत उत्तम आराम मिळवण्यासाठी दीर्घ श्वास घ्या, चिंतन किंवा योग करा.
  • डॉक्टरांचे मार्गदर्शन : तणाव वाढल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. त्यामुले तणावाचा सामना करण्याच्या पद्धती, तसेच तणावाचे व्यवस्थापन करण्याबाबत मदत होईल. जीवनात तणाव येणे स्वाभाविक आहे, पण गर्भधारणेसाठी तणावाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या पद्धतींमुळे तणावाची पातळी कमी होऊन यशस्वीरीत्या गर्भधारणेची शक्यता आहे.