चोरीची कार कोणाची ? उच्च न्यायालय देणार निर्णय

35

सामना ऑनलाईन । गुजरात

गुजरातमध्ये एका चोरट्याने चोरीच्या पैशातून त्याच्या मुलाला लग्नात कार भेट दिली होती. पोलिसांनी या चोरट्याला अटक केल्यानंतर त्याच्या मुलाकडून ही कार जप्त केली. मात्र आता या कारवरून न्यायालयात दोन खटले दाखल झाले आहेत. ज्यांच्या घरात चोरी झाली त्या शरदचंद्र शाह तसेच त्या चोरट्याचा मुलगा संजय मकवाना या दोघांनीही त्या कारवर दावा ठोकत कार मिळविण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू केला आहे. त्यामुळे आता ही कार नक्की कोणाला मिळणार याबाबत गुजरात उच्च न्यायालयात जोरदार चर्चा रंगली आहे.

अहमदाबादमधील शरदचंद्र शाह यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. त्यांच्या घरातून १९.५ लाख रोख रक्कम व काही दागिने चोरीला गेले होते. या घटनेबद्दल पोलिसांनी तपास केल्यावर सुरेश मकवाना या आरोपीला अटक केली. त्याने चोरी केलेल्या पैशांतून ११ लाख रुपयांची कार विकत घेतल्याचे सांगितले आहे. तसेच ती कार आपला मुलगा संजयला लग्नात भेट दिल्याचे ही मान्य केले आहे. त्यामुळे शरदचंद्र यांनी सदर कार माझ्या घरातून चोरी केलेल्या पैशातून विकत घेतल्याचे सांगत ती कार त्यांना मिळावी म्हणून मिर्जापूरातील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला आहे. मात्र संजयने त्यांच्या या मागणीला विरोध करत त्यालाच ही कार देण्यात येण्याची मागणी केली आहे. संजयने ती कार त्याला व त्याच्या बायकोला लग्नात मिळालेली भेटवस्तू असल्याचे सांगत आता त्या कारचा आणि चोरीचा काहीच संबंध नसल्याचा दावा न्यायालयता केला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आरपी धोरलिया हे या प्रकरणाची अंतिम सुनावणी ३० जुलै रोजी करणार असून त्याा दिवशी कारचा खरा मालक कोण ते ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या