IPL 2024 पावसाने प्ले ऑफचा थरारच संपवला! हैदराबाद-गुजरात सामना पावसामुळे रद्द

प्ले ऑफच्या सस्पेन्स साऱयांचेच हृदयाचे ठोके वाढवले होते. एखाद्या सस्पेन्स सिनेमाप्रमाणे हा संघ जाणार की तो संघ जाणार, याची गणिते मांडली जात होती. प्ले ऑफ कोण गाठणार याचं कोडं उलगडणार तोच मुसळधार पावसाने सारे कोडेच सोडवून टाकले. पावसाच्या मुसळधार आणि संततधार बॅटिंगमुळे सामनाच वाहून गेला आणि त्याने हैदराबादला प्ले ऑफच्या किनाऱयावर नेऊन सोडले. त्यामुळे प्ले ऑफचे स्वप्न रंगवत असलेले लखनऊ आणि दिल्ली हे दोन्ही संघ आपोआप साखळीतच वाहून गेलेत.

आजचा सामना वाहून गेल्यामुळे आता चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील निकालानंतर प्ले ऑफचा चौथा संघ निश्चित होईल. चेन्नई जिंकली तरी थेट दुसऱया स्थानावर पोहोचेल आणि हरली तर बंगळुरू किती मोठा विजय मिळवतोय यावर त्यांचे प्ले ऑफचे स्थान ठरेल. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे पराभवाचा षटकार सहन करणाऱया बंगळुरूला विजयाचा षटकार ठोकण्याचा दुर्मिळ विक्रम करण्याची संधी चालून आली आहे. एकात स्पर्धेत सलग सहा पराभवांनंतर सलग सहा विजय नोंदविणारा बंगळुरू पहिला संघ असेल. याआधी असा दुर्मिळ योगायोग कोणत्याही संघाला साधता आला नव्हता. विशेष म्हणजे या आयपीएलमध्ये राजस्थान आणि कोलकाता या संघांनी विजयाचा चौकार ठोकला आहे. पण बंगळुरून सलग पाच विजय नोंदविले असून सलग सहाव्या विजयाची संधी त्यांना लाभली आहे. या दोघांचा फैसला शनिवारी 18 मे रोजी बंगळुरूत होईल.

आज हैदराबादच्या पराभवासाठी दिल्ली आणि लखनऊने पाण्यात देव बुडवून ठेवले होते. हैदराबादचा पराभवच त्यांचे प्ले ऑफची आव्हान जिवंत ठेवणार होता, पण आज घडले नेमके वेगळे. पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही आणि दिल्ली-लखनऊचे आव्हान आपोआप संपुष्टात आले. आधीच 14 अंकांवर असलेल्या हैदराबादला अनिर्णित सामन्याचा एक गुण मिळाल्यामुळे त्यांची प्ले ऑफ पक्की झाली. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेलेल्या मुंबई आणि लखनऊ यांच्यातील उद्या वानखेडेवर होणारी लढत निव्वळ औपचारिकता पूर्ण करणारी ठरणार आहे. आयपीएलचा शेवट गोड करण्याचे ध्येय दोन्ही संघांसमोर उरले असल्यामुळे सामन्याची मजाच निघून गेली आहे.