वेब न्यूज – ये रे ये रे पैसा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्याच्या बँक खात्यात अचानक लाखो, करोडो रुपये जमा होण्याचे प्रकार आजकाल बरेचदा घडताना दिसतात. एखाद्या व्यक्तीच्या चुकीने अथवा यंत्रणेमधील दोषाने असे घडत असते. कधी ही चूक लगेच लक्षात येते तर कधी तिला बराच अवधी लागतो. सध्या अशाच दोन घटना प्रचंड चर्चेत आहेत. त्यातील एक घटना आहे ऑस्ट्रेलियातील तर एक आपल्या गुजरातमधील.

ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका रॅपरच्या अब्देल घडियाच्या खात्यात अचानक 5,15,000 डॉलर्स जमा झाले. हिंदुस्थानी चलनात साधारण 4.2 कोटी रुपये. एका जोडप्याने घर खरेदीच्या वेळी पैसे पाठवताना केलेल्या चुकीने हे पैसे भलत्याच म्हणजे या रॅपरच्या खात्यात जमा झाले. साहेबांनी बँकेकडे काही चौकशी न करता दे दणादण पैसे उधळले. सर्वात जास्त खरेदी केली ती सोन्याची. पुढे ही चूक लक्षात आल्यावर बँकेने पैसे परत मागितले. मात्र वसुली शक्य नाही लक्षात आल्यावर मग कायद्याचा आधार घेतला. या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली असून या रॅपरला 18 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तर इकडे गुजरातच्या अहमदाबादमध्ये शेअर बाजारात ट्रेडर असलेल्या रमेश भाई सागर यांच्या डिमॅट अकाऊंटमध्ये चक्क 11,677 करोड रुपये अचानक जमा झाले. आधी ते थोडे गोंधळले खरे, पण सागरभाई हुशार माणूस; त्यांनी ताबडतोब त्यातले दोन करोड रुपये शेअर बाजारात गुंतवले आणि अर्ध्या तासात 5.64 लाखांचा नफा पदरात पाडून घेतला. शेअर मार्केटचे ज्ञान त्यांना चांगले उपयोगात आले. या दोन्ही कथा रंजक असल्या तरी त्या आपल्याला सावधदेखील करणाऱ्या आहेत. आपल्यासोबत असा एखादा प्रसंग घडल्यास, त्या पैशाच्या मोहात न पडता तातडीने बँकेशी संपर्क साधा आणि घडलेला प्रकार कळवा. रमेशभाईंना जे जमले ते प्रत्येकाला जमेलच असे नाही. अशा प्रकरणात रॅपर अब्देल घडिया होण्याची शक्यता जास्त!