एकतर्फी प्रेमाला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार, आठ जणांना अटक

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. ही मुलगी घरात शौचालय नसल्याने प्रात:विधींसाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी आरोपींनी तिचे अपहरण केल व निर्जन स्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीवर बलात्कार करणाऱ्या 8 जणांना अटक केली आहे.

नवसारी जिल्ह्यातील वसंदा गावात ही घटना घडली आहे. सदर मुलगी प्रात: विधीसाठी गेली होती. त्यावेळी गावातील तीन मुलांनी तिचे अपहरण केले व तिला दुसऱ्या गावात घेऊन गेले. तिथे त्यांनी आणखी पाच मित्रांना बोलावले. त्यांना आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.

मुलीच्या वडिलांना मध्यरात्री जाग आली तेव्हा मुलगी घरात नव्हती. त्यामुळे त्यांनी शोधशोध सुरू केली. मात्र मुलगी सापडली नाही. सकाळी ते पोलिसांत तक्रार करायला जाणार होते. मात्र दुसऱ्या दिवशी आरोपींनी मुलीला गावाबाहेर एका व्हॅनमध्ये ठेवले व तेथून ते फरार झाले. त्यानंतर ती मुलगी तिथून चालत तिच्या घरी आली व तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला.

मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केली. त्यातील एकाचे मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र मुलीने नकार दिला होता. त्यानंतर त्याने तिच्याकडे शारिरीक संबंधांची मागणी केली होती त्यालाही तिने नकार दिला होता. त्यामुळे तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे आरोपीने सांगितले आहे.