300 हून अधिक जागा जिंकू म्हटल्यावर माझी चेष्टा केली होती- मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 300 हून अधिक जागा मिळतील असा विश्वास मी मतदानाच्या सहाव्या टप्प्यानंतर व्यक्त केला होता तेव्हा लोकांनी माझी चेष्टा केली होती, पण आता निकाल समोर आलाय. हा ऐतिहासिक जनादेश असून पुढची पाच वर्षे देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. पुढची पाच वर्षे लोकसहभागाची आणि लोकांमधील चेतनेची असतील अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अहमदाबाद विमानतळावर मोदींचे आगमन झाले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी मोठय़ा जल्लोषात त्यांचे स्वागत केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर गुजरात भाजप कार्यालयापर्यंत रोड शो करण्यात आला. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपवानी उपस्थित होते. त्यानंतर भाजपच्या 50 वर्षे जुन्या कार्यालयासमोरच एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत मोदी यांनी जनतेला संबोधित केले.

भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सुरत अग्नितांडवाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. सुरत दुर्घटनेमुळे मोठी मिरवणूक काढायची नाही असा निर्णय भाजपने घेतला. ज्या कुटुंबांनी आपली मुले गमावली, आपले भविष्य गमावले त्यांच्यासाठी मी ईश्वराकडे प्रार्धना करतो की, त्यांच्या कुटुंबीयांना देव दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असेही मोदी भावुक होऊन म्हणाले.