पन्नूच्या हत्येसाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्याने भाडोत्री मारेकऱ्यांना सुपारी दिली, अमेरिकेचा आरोप

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने हिंदुस्थानी नागरिकाविरोधातकायदेशीर कारवाई सुरू केली आहे. निखील गुप्ता असं या हिंदुस्थानी नागरिकाचे नाव आहे. अमेरिकेतील सरकारी वकील डॅमियन विल्यम्स यांनी एक विधान जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की “शिखांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्या आणि न्यूयॉर्कमध्ये राहात असलेल्या एका हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकाची हत्या करण्याचा कट रचण्यात आला आहे.” यांनी एक विधान जारी केले की, “प्रतिवादीने भारतातून न्यूयॉर्क शहरात प्रवास करणाऱ्या भारतीय-अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट रचला, जो शिखांसाठी स्वतंत्र मातृभूमी तयार करण्याचा जाहीरपणे समर्थन करतो.” या विधानामध्ये पन्नू याचे नाव लिहिलेले नसले तर हा उल्लेख त्याच्याच बाबतीत असल्याचे कळते आहे.

अमिरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की हिंदुस्थानच्या एका अज्ञात अधिकाऱ्याने हत्येसाठी निखील गुप्ता नावाच्या व्यक्तिला सुपारी दिली होती. गुप्ता हा अंमली पदार्थ आणि हत्याराचा आंतरराष्ट्रीय तस्कर आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 52 वर्षीय निखिल गुप्ता हा हिंदुस्थानी नागरीक असून अमेरिका आणि झेक प्रजासत्ताक यांच्यात झालेल्या द्विपक्षीय प्रत्यार्पण कराराअंतर्गत त्याला 30 जून रोजी अटक करण्यात आली होती. ज्या हिंदुस्थानी अधिकाऱ्याने ही सुपारी दिली होती त्याचे नाव कळू शकलेले नाहीये मात्र त्याचा उल्लेख सीसी-1 म्हणून करण्यात आला आहे. सीसी-1 आणि निखील गुप्ता यांनी मिळून अमेरिकेमध्ये एका वकिलाची आणि एका राजकीय कार्यकर्त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. सीसी-1 अधिकारी हा गुप्तचर संघटनेशी निगडीत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

हिंदुस्थानात बसलेल्या सीसी-1 च्या सांगण्यावरून निखिल गुप्ताने हत्येसाठी मारेकरी शोधण्यास सुरुवात केली होती. निखिल गुप्ताला यासाठी एक माणूस सापडला होता मात्र तो अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेत काम करणारा होता. या मारेकऱ्याने खून करण्यासाठी निखील गुप्ताची एका माणसासोबत भेट घालून दिली होती. तो देखील अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेत काम करणारा होता.

जून महिन्यात निखील गुप्ता याला ज्याचा खात्मा करायचा आहे त्या व्यक्तीची सगळी माहिती देण्यात आली होती. ही माहिती गुप्ताने मारेकऱ्यांना दिली होती. या माहितीमध्ये कॅनडामध्ये हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचाही उल्लेख होता. निखील गुप्ताने मारेकऱ्यांना सांगितलं होतं की निज्जर हा देखील ‘टार्गेट’ होता. 30 जूनच्या आसपास गुप्ताने हिंदुस्थानातून चेक रिपब्लिक असा प्रवास केला होता. यावेळी अमेरिकेच्या विनंतीवरून चेक रिपब्लिकमध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

सीसी-1 ने निखिल गुप्ता याला ‘टार्गेट’ची सगळीमाहिती दिली होती, ज्यात त्याच्या घरचा पत्ता, फोन नंबर आणि न्यूयॉर्क शहरातील रोजच्या हालचालींचा तपशील होता. सीसी-1 ने या कामासाठी 1 लाख डॉलर्स देण्याचे मान्य केले होते ज्यातील 15 हजार डॉलर्स आगाऊ रक्कम म्हणून देण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. गुप्ताने सीसी-1 शी बोलताना ‘टार्गेट’ला उडवण्यासाठी आता आणकी प्रतीक्षा करण्याची गरज नाही असे म्हटले होते.

अमेरिकी कागदपत्रांत म्हटले आहे की, “18 जून 2023 च्या आसपास मुखवटा घातलेल्या मारेकऱ्यांनी हरदीप सिंग निज्जरची कॅनडातील शीख प्रार्थनास्थळाबाहेर हत्या केली होती. निज्जर हा ‘टार्गेट’ चा सहकारी होता हत्येच्या संध्याकाळी सीसी-1 ने गुप्ता याला एक व्हिडीओ पाठवला होता, ज्यात निज्जर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत होता.

न्यूयॉर्क शहरातील ‘टार्गेट’च्या घराचा पत्ता देण्यात आला होता. निज्जरच्या हत्येनंतर, निखिल गुप्ताने मारेकऱ्यांना सांगितले होते की निज्जर हा देखील ‘टार्गेट’ होता आणि अजून बरेच ‘टार्गेट’ आहेत. अमिरेकेने आरोप केला आहे की सीसी-1 ने निखिल गुप्ताला एक मेसे पाठवला होता, यामध्ये पन्नूशी निगडीत बातमी होती. सीसी-1 ने ही आपली प्राथमिकता असल्याचे गुप्ताला सांगितले होते.