
पुणे शहरातील फर्ग्युसन रस्त्यावरून गुटखा वाहतूक करणारा छोटा हत्ती टेम्पो शिवाजीनगर पोलिसांनी पकडला. टेम्पोचालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून 38 हजारांचा गुटख्याचा साठा, टेम्पो असा 2 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर दादासाहेब जगताप (28, रा. कर्वेनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. जगताप याच्यावर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात दोन दिवसांपासून गुटखा विक्रेत्यांवर छापेमारी सुरू आहे. पोलिसांनी तब्बल 35 ते 40 विक्रेत्यांवर कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. सलग दुसर्या दिवशी शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात येत आहे. या दरम्यान फर्ग्युसन रस्त्यावरून छोटा हत्ती टेम्पोतून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून टेम्पो पकडला. त्यावेळी पाहणी केली असता त्यामध्ये 36 हजारांचा साठा आढळून आला. त्यानूसार टेम्पो चालकाला ताब्यात घेत टेम्पो जप्त करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरिंवद माने, पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भोलेनाथ अहीवळे, अविनाश भिवरे, रणजित फडतरे, बशीर सय्यद, गणपत वाळकोळी, प्रवीण राजपुत, अतुल साठे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
कोंढव्यात सव्वा लाखांचा साठा जप्त
कोढव्यातील एन.आय.बी.एम रस्ता परिसरातील पप्पू पान शॉप येथे विक्रीसाठी ठेवलेला तब्बल 1 लाख 26 हजारांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करून जीतलाल श्रीरामनंदन यादव (39, रा. कोंढवा) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलीस नाईक ज्योतीबा पवार यांनी तक्रार दिली आहे.


























































